TikTok अॅपवर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. भारतामध्येही या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. हे अॅप चिनी असून आता व्हेनेझुएलाने टीकटॉकला जबरी दंड ठोठावला आहे, टीकटॉकला एक कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. टीकटॉकवर काही चॅलेज दिली जात आहेत. जी पूर्ण करण्याच्या नादात तरुणांचा मृत्यू होत असल्याचं दिसून आलं आहे. याच कारणामुळे टीकटॉकला दंड ठोठावण्यात आला आहे. व्हेनेझुएलामध्ये ही धोकादायक चॅलेज पूर्ण करण्याच्या नादात 3 तरुण मृत्यूमुखी पडले असून जवळपास 200 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सर्वोच्च न्यायालयाने TikTok ला दंड ठोठावताना या चिनी कंपनीने निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. तरुणांसाठी जीवघेण्या आणि हानीकारक मजकूर प्रसारीत करण्यात टीकटॉक कमी पडल्याचे व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. चीनच्या ByteDance च्या मालकीच्या TikTok ने आठ दिवसांच्या आत व्हेनेझुएलामध्ये कार्यालय सुरू करावे आणि दंड त्वरित भरावा किंवा अतिरिक्त दंडाला सामोरे जावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. टीकटॉक ही बाईटडान्स या कंपनीचे उत्पादन आहे. इन्स्टाग्राम आणि युट्युब शॉर्टचा उदय होण्यापूर्वी टीकटॉकने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. टीकटॉकवर अनेकजण रीलस्टार झाले होते, आणि गावगल्लीतील तरुण-तरुणी प्रकाशझोतात आले होते. मात्र हे अॅप देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे त्यावर बंदी घालण्यास सुरुवात झाली, भारतानेही या अॅपवर बंदी घातली आहे.
टीकटॉककडून दंडापोटी जी रक्कम वसूल केली जाणार आहे तिचा वापर या अॅपच्या वापरामुळे ज्या तरुणांना, मुलांना शारिरीक, मानसिक त्रास झाला आहे अशांना नुकसान भरपाई देण्यासाठी केला जाणार आहे. टीकटॉक पीडितांसाठी एक निधी उभारण्यात येणार असून दंडाची रक्कम या निधीत वर्ग करण्यात येणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - New Year 2025 : 5 कामांनी करा नव्या वर्षाची सुरुवात, संपूर्ण वर्ष जाईल खास
टीकटॉकवरील जीवघेण्या चॅलेंजबद्दल बोलताना व्हेनेझुएलाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की या चॅलेंजमध्ये भाग घेणाऱ्यांना घातक रासायनिक पदार्थ हाताळण्याचे आव्हान देण्यात आले होते. टीकटॉकने संभाव्य धोके ओळखून ते रोखण्यासाठी एक धोरण तयार केले आहे, मात्र टीकटॉकवरील ही आव्हाने या धोरणाला अडगळीत टाकून व्हायरल केली जात असल्याचे दिसून आले. आपल्या मजकुरामुळे कोणाचा जीव जाणार नाही याची खात्री बाळगणं टीकटॉकसाठी गरजेचे होते, मात्र टीकटॉककडून यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या जीवघेण्या चॅलेंजचे व्हिडीओ व्हायरल झाले.