Vladimir Putin Makes Shehbaz Sharif Wait for 40 Minutes: काही दिवसांपूर्वीच भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संपूर्ण जगासमोर पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवली आहे. इंटरनॅशनल पीस अँड ट्रस्ट फोरमच्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पुतीन यांच्या भेटीसाठी तब्बल 40 मिनिटे ताटकळत बसावे लागले.
इतकंच नव्हे, तर पुतीन आले नाहीत म्हणून वैतागलेल्या शरीफ यांनी थेट तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांसोबत सुरू असलेल्या पुतीन यांच्या 'बंद दाराआडच्या' बैठकीतच घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.
40 मिनिटे प्रतीक्षा करूनही पुतीन आले नाहीत
तुर्कमेनिस्तानमध्ये आयोजित 'इंटरनॅशनल पीस अँड ट्रस्ट फोरम'च्या बैठकीसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप अर्दोआन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ उपस्थित होते. या दरम्यान, पुतीन आणि अर्दोआन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे पुतीन यांच्या भेटीसाठी बेचैन झाले होते.
( नक्की वाचा : कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या )
रशिया टुडे (RT) वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओनुसार, शहबाज शरीफ एका मीटिंग हॉलमध्ये रशिया आणि पाकिस्तानचे झेंडे लावलेल्या दोन खुर्च्यांपैकी एका खुर्चीवर बसून पुतीन यांची आतुरतेने वाट पाहत होते.
व्हिडिओमध्ये ते तोंडावर बोट ठेवून बेचैनीने प्रतीक्षा करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तेथील अधिकाऱ्यांकडून पुतीन कधी येणार याची माहिती घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण अधिकारीही उत्तर देऊ शकले नाहीत.
वाट पाहून वैतागले, थेट मीटिंगमध्येच 'घुसले'
जवळपास 40 मिनिटांपर्यंत वाट पाहूनही पुतीन आले नाहीत, तेव्हा शरीफ यांचा संयम सुटला. निराश आणि चिडलेले चेहरा घेऊन ते आपल्या खुर्चीवरून उठले आणि दुसऱ्या रूममध्ये वेगाने चालत गेले.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शरीफ थेट बाजूच्या रूममध्ये घुसले, जिथे पुतीन आणि अर्दोआन यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. मात्र, शरीफ यांना तिथे बघूनही पुतीन यांनी त्यांना कोणताही 'भाव' दिला नाही किंवा त्यांचे स्वागत केले नाही.
( नक्की वाचा : Putin: नकली पुतिन', 'पॉटी' सूटकेस आणि 'न्यूक्लियर' कमांड... पुतिन यांच्या सुरक्षा चक्राची ही आहेत खतरनाक रहस्य )
आरटीनुसार, शहबाज शरीफ यांनी त्या बैठकीतही सुमारे 10 मिनिटं वाट पाहिली, पण तिथेही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, त्यांना अपमानास्पद स्थितीत तिथून कोणत्याही भेटीशिवाय माघारी फिरावे लागले. यावरून शहबाज शरीफ हे तिथे 'बिनबुलाए मेहमान' म्हणून गेल्याचे स्पष्ट होते.
पुतीन यांचा भारत दौरा चर्चेचा विषय
पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ही नामुष्की अशा वेळी झाली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारत दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध यावेळी पुन्हा दिसून आले. पुतीन यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वतः प्रोटोकॉल मोडून एअरपोर्टवर त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत प्रवास केला होता.
या दौऱ्यातील मोदी आणि पुतीन यांची कारमधील फोटो चांगलेच गाजले. अमेरिकेच्या संसदेतही हा मुद्दा उपस्थित झाला होता. डेमोक्रॅट खासदार सिडनी कॅमलेगर-डव यांनी अमेरिकेच्या संसदेत हे फोटो दाखवून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, पुतीन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिलेली वागणूक आणि त्यांचा भारतासोबतचा मैत्रीपूर्ण संबंध यातला फरक आंतरराष्ट्रीय राजकारणात बोलका ठरला आहे.