US-Iran War: पाकिस्तानच्या मध्यस्थीची स्क्रिप्ट अमेरिकेची? ट्विटमध्ये एडिट केलेल्या एका ओळीने जगभरात चर्चांना

US Iran Ceasefire For 2 Weeks: अमेरिका आणि इराणमधील दोन आठवड्यांच्या युद्धविरामात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ एका चुकीच्या ट्विटमुळे वादात सापडले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

US Iran Ceasefire For 2 Weeks: अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा ऐतिहासिक युद्धविराम (Ceasefire) जाहीर झाला आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ एका मोठ्या डिजिटल चुकीमुळे ट्रोल होत आहेत. सीजफायरच्या घोषणेपूर्वी शरीफ यांनी 'X' (ट्विटर) वर एक पोस्ट केली होती, ज्याच्या सुरुवातीला चुकून मजकुराचे स्वरूप दर्शवणारा 'Draft' हा शब्द राहिल्याने त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला आहे.

नेमका वाद काय?

शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणला दिलेली मुदत वाढवण्याची आणि शांततेसाठी वेळ देण्याची विनंती केली होती. मात्र, हे ट्विट पोस्ट करताना त्याच्या सर्वात वरच्या भागात असे लिहिले होते की,
"Draft - Message from the Prime Minister of Pakistan on X."

Advertisement

या एका ओळीमुळे सोशल मीडियावर युजर्सनी संशय व्यक्त केला आहे. सामान्यतः पंतप्रधानांची टीम ड्राफ्ट तयार करताना 'पंतप्रधानांचा संदेश' असे लिहिते, मात्र त्यात 'पाकिस्तानचे पंतप्रधान' असा उल्लेख असल्याने हा मजकूर बाहेरून, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून पाठवण्यात आला असावा, असा तर्क लावला जात आहे. 

(नक्की वाचा-  US-Iran War Update: अमेरिका-इराणमध्ये 2 आठवड्यांचा युद्धविराम; दोन्ही देशांमध्ये नेमकं काय ठरलं?)

घाईघाईत ट्विट 'एडिट' 

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) हे ट्विट त्वरित एडिट करून त्यातील 'ड्राफ्ट' हा शब्द हटवला. मात्र, तोपर्यंत नेटकऱ्यांनी याचे स्क्रीनशॉट्स काढून ते व्हायरल केले होते. मात्र अनेक युजर्सनी सवाल केला की, "आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचे नाव ड्राफ्टमध्ये कोण लिहितं? हे स्पष्टपणे अमेरिकेकडून आलेली 'स्क्रिप्ट' वाटत आहे." या चुकीमुळे पाकिस्तानची मध्यस्थी ही केवळ नावापुरती असून पडद्यामागून सूत्रे अमेरिका हलवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

(नक्की वाचा- Oil India: इंधन संकटादरम्यान राजस्थानातून गुड न्यूज! वाळवंटातून निघालं 'काळं सोनं)

शहबाज शरीफ यांच्या ट्विटमधील मजकूर

ट्विटमध्ये शरीफ यांनी म्हटले की, "मध्य पूर्वेतील युद्ध शांततेने सोडवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विनंती करतो की त्यांनी चर्चेसाठी 2 आठवड्यांची मुदत वाढवावी. आम्ही आमच्या इराणी बांधवांना विनंती करतो की त्यांनी सदिच्छा म्हणून 2 आठवड्यांसाठी होर्मुजची सामुद्रधुनी खुली करावी. दीर्घकालीन शांततेसाठी सर्व युद्धखोर पक्षांनी 2 आठवड्यांचा युद्धविराम पाळावा."

विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही वेळातच दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला. इराणने याला आपला 'विजय' म्हटले आहे, तर पाकिस्तानने या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या 'ड्राफ्ट' प्रकरणामुळे पाकिस्तानच्या सोशल मीडिया टीमच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement