आपल्या प्रियजनांना त्यांच्या मृत्यूनंतरही सोबत ठेवण्याच्या कल्पनेला वास्तवात आणण्याचा दावा एका जर्मनीतील कंपनीने केला आहे. Tomorrow Bio नावाच्या या कंपनीने मृतदेह गोठवून ठेवण्याची म्हणजेच क्रायोप्रिझर्वेशनची सेवा सुरू केली आहे. यासाठी कंपनी 2 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 2 कोटी रुपये इतके शुल्क आकारत आहे.
'टुमारो बायो' कंपनीचा दावा आहे की, त्यांच्याकडे 24X7 काम करणारी आपत्कालीन टीम आहे, जी कायदेशीर मृत्यू झाल्यानंतर लगेच ही प्रक्रिया सुरू करते. भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके प्रगत होईल की, हे गोठवलेले मृतदेह पुन्हा जिवंत करणे शक्य होईल आणि ज्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला, त्यावरही उपचार करता येतील.
(नक्की वाचा - 2 आठवडे साखर बंद केली तर...? तुमचं व्यक्तिमत्त्वचं बदलून जाईल, ट्राय करून पाहा!)
क्रायोप्रिझर्वेशन म्हणजे काय?
क्रायोप्रिझर्वेशन ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यात शरीरातील सेल्स आणि टिश्यूज् कमी तापमानावर गोठवून त्यांचे संरक्षण केले जाते. या प्रक्रियेमध्ये शरीराला -196 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानावर गोठवण्यासाठी लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कायदेशीररित्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर तातडीने ही प्रक्रिया सुरू करावी लागते, अन्यथा शरीरातील पेशींचे नुकसान होते. कंपनीने आतापर्यंत काही मृतदेह गोठवले असून, भविष्यात ते पुन्हा जिवंत होतील या आशेवर त्यांचे कुटुंबीय आहेत.
कंपनीच्या दाव्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत 650 हून अधिक लोकांनी कंपनीसोबत करार केला आहे. मृत्यूला टाळता येईल या आशेवर लोक आपली नोंदणी करत आहेत. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 'टुमारो बायो' ही युरोपमधील पहिली क्रायोनिक्स लॅब आहे. आतापर्यंत कंपनीने 3 ते 4 व्यक्तींना आणि 5 पाळीव प्राण्यांना क्रायोप्रिझर्व्ह केले आहे. 2025 मध्ये कंपनी अमेरिकेत देखील आपली सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे.
(नक्की वाचा- Is Too Much Sleep Harmful: जास्त झोप घेणं धोकादायक आहे? 9 तासांहून अधिक झोप घेतल्याने कोणत्या आजारांचा धोका?)
या सेवेमुळे नैतिक आणि वैज्ञानिक वादविवाद देखील सुरू झाले आहेत. किंग्ज कॉलेज लंडनचे न्यूरोसायन्सचे प्राध्यापक क्लाईव्ह कोएन यांनी या संकल्पनेला "हास्यास्पद" म्हटले आहे. त्यांच्या मते, मानवासारख्या जटिल मेंदू असलेल्या जीवांना यशस्वीरित्या पुनरुज्जीवित करता येईल याचा कोणताही पुरावा सध्या नाही.
मात्र जीवन आणि मृत्यू वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही सेवा अनेक लोकांना आकर्षित करत आहे. मात्र यामागील आर्थिक खर्च मोठा आहे, तर निश्चितता काहीही नाही. जगातील काही श्रीमंत व्यक्ती आणि वैज्ञानिक चमत्कारावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी ही सेवा एक नवीन आशा बनली आहे.