What is Nikah Mutah?: काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी पती-पत्नीचे नाते, मौजमजेसाठीचा लग्नसोहळा आणि वेळ संपताच कोणताही कायदेशीर त्रास न घेता एकमेकांपासून वेगळे होण्याची मुभा. ऐकायला नक्कीच अजब वाटेल, पण काही मुस्लिम देशांमध्ये अशी तात्पुरती लग्ने लावून देण्याची प्रथा आजही सर्रास सुरू आहे. धार्मिक मान्यता असलेल्या या प्रथेचा गैरफायदा आता श्रीमंत परदेशी पर्यटक घेत असून, यामुळे गरीब तरुण मुली मोठ्या प्रमाणावर शोषणाचा बळी ठरत आहेत.
काय आहे निकाह मुताह?
अरबी भाषेमध्ये या प्रकारच्या लग्नाला 'निकाह मुताह' (Nikah Mutah) किंवा 'प्लेजर मॅरेज' (Pleasure Marriage) म्हणजेच आनंदासाठीचे लग्न असे म्हटले जाते. हे एक प्रकारचे तात्पुरते लग्न (Temporary Marriage) असते. या लग्नाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, लग्न करण्यापूर्वीच दोन्ही बाजूंच्या संमतीने हे लग्न किती काळासाठी वैध असेल हे निश्चित केले जाते.
हा विवाह कालावधी काही तासांचा, काही दिवसांचा किंवा काही महिन्यांचाही असू शकतो. ठरवलेली वेळ संपताच हे लग्न कायदेशीररीत्या आपोआप संपुष्टात येते. यासाठी कोणत्याही घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेची गरज भासत नाही.
( नक्की वाचा : 15 दिवसांची बायको ! 'या' मुस्लीम देशात धडाधड होत आहेत लग्न! वाचा काय आहे भानगड? )
पैसे द्या आणि लग्न करा
या निकाह मुताह दरम्यान नवरदेव बनणाऱ्या पुरुषाने महिलेला एक निश्चित केलेली रक्कम किंवा 'मेहर' देणे अनिवार्य असते. विशेष म्हणजे, या विवाहातून जर एखाद्या अपत्याचा जन्म झाला, तर त्याला कायदेशीर मानले जाते आणि वडिलांच्या संपत्तीवर त्या मुलाचा पूर्ण हक्क असतो.
सध्याच्या डिजिटल युगात इराण आणि इतर काही देशांमध्ये अशा तात्पुरत्या लग्नांसाठी खास 'मुताह ॲप्स' आणि वेबसाईट देखील उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, एकूण विवाहांच्या तुलनेत याचे प्रमाण खूपच कमी आहे.
( नक्की वाचा : Lohagad Fort: लोहगडावरील 'सिया पॉईंट'पाहण्यासाठी देशभरातून गर्दी; 2000 वर्षांच्या इतिहासाला अनपेक्षित वळण )
कोणत्या देशांमध्ये आहे ही प्रथा?
ही परंपरा प्रामुख्याने शिया मुस्लिम समुदायामध्ये धार्मिक आणि कायदेशीररीत्या पाळली जाते. मुस्लिम जगतातील 85 ते 90 टक्के लोकसंख्या असलेल्या सुन्नी मुस्लिम समुदायात या लग्नाला पूर्णपणे निषिद्ध म्हणजेच 'हराम' मानले जाते. इराण हा शिया बहुल देश असल्याने तिथे निकाह मुताहला कायदेशीर मान्यता असून त्याचे रीतसर रजिस्ट्रेशन होते.
याशिवाय इराक आणि लेबनानमधील शिया समुदायातही याला सामाजिक मंजुरी आहे. इंडोनेशिया, बहरीन, येमेन, पाकिस्तान आणि भारताच्या काही भागांत जिथे शिया लोक राहतात, तिथेही अशा प्रकारची लग्ने समोर आली आहेत.
पर्यटकांकडून प्रथेचा गैरफायदा
धार्मिक पर्यटनासाठी इराक किंवा सिरिया सारख्या देशात येणारे श्रीमंत परदेशी पर्यटक या प्रथेचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांच्या मौजमजेसाठी हे पर्यटक तिथल्या स्थानिक गरीब मुलींशी काही दिवसांचा निकाह करतात आणि वेळ संपताच मायदेशी निघून जातात.
मात्र, अनेकदा परदेशी पर्यटक लग्नाचा कालावधी संपण्यापूर्वीच देश सोडून जातात, अशा वेळी त्या गरीब महिलांना कोणतीही भरपाई मिळत नाही. इतकंच नाही तर यातून मूल जन्माला आले, तर त्या मुलाच्या नागरिकत्वाचा आणि संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
धार्मिक परंपरेच्या नावाखाली शोषण?
पारंपरिक आणि प्रतिष्ठित शिया कुटुंबांमध्ये आजही आपल्या कुमारिका मुलींचे अशा प्रकारे मुताह लग्न लावण्यास नकार दिला जातो, कारण याकडे प्रतिष्ठेच्या नजरेतून पाहिले जाते. मात्र, विधवा किंवा घटस्फोटित गरीब महिलांच्या बाबतीत काहीसा मवाळ दृष्टिकोन ठेवला जातो. अनेकदा तरुण मुले आणि मुली घरच्यांना थांगपत्ता लागू न देता गुपचूप असे निकाह करून घेतात.
जागतिक मानवाधिकार संघटनांनी या प्रथेवर कडक शब्दांत टीका केली असून, धार्मिक परंपरेच्या नावाखाली हे केवळ महिलांचे शारीरिक शोषण करण्याचे माध्यम बनले असल्याची खंत व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world