सूरज कसबे, प्रतिनिधी
Lohagad fort Siya point: लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ला सध्या एका अत्यंत वेगळ्या आणि धक्कादायक कारणाने देशभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक केतन अग्रवाल याची त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी 400 फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या हाय-प्रोफाईल मर्डर केसनंतर आता लोहगड किल्ल्यावरील पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही हत्या नेमकी कुठे झाली आणि आरोपींनी केतनला दरीत कसे ढकलले, हे प्रत्यक्ष पाहण्याच्या उत्सुकतेपोटी लोहगडावर पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने ओढली जात आहेत.
'सिया पॉईंट' पाहण्यासाठी गर्दी
केतन अग्रवाल हत्येच्या या थरारक तपासानंतर लोहगड किल्ल्यावरील पर्यटकांच्या संख्येत तब्बल 25 टक्के वाढ झाली आहे. ज्या ठिकाणावरून केतनला दरीत ढकलण्यात आले, त्या जागेला आता येणारे पर्यटक अनधिकृतपणे 'सिया पॉईंट' म्हणून ओळखू लागले आहेत. केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर अगदी दिल्लीसारख्या दूरच्या ठिकाणांवरूनही अनेक पर्यटक हा मर्डर स्पॉट पाहण्यासाठी किल्ल्यावर पोहोचत आहेत.
लोहगडावर तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि स्थानिक लोकांकडे पर्यटक 'सिया पॉईंट' कुठे आहे, अशी विचारणा करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कुतूहलामुळे कधीकाळी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याला आता एका अनपेक्षित गुन्ह्याच्या स्थळाचे वळण मिळाले आहे.
( नक्की वाचा : Lohagad Fort: नरबळी ते भुतांचा वावर, 2000 वर्ष जुना लोहगड किल्ला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला का आहे? )
पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ
या धक्कादायक घटनेमुळे लोहगड किल्ल्यावरील गर्दीने नवे रेकॉर्ड केले आहेत. एरव्ही सामान्य दिवसांमध्ये (सोमवार ते शुक्रवार) किल्ल्यावर दररोज सुमारे 400 पर्यटक येत असत, हा आकडा आता 600 च्या पार गेला आहे. तर शनिवार आणि रविवार सारख्या सुट्ट्यांच्या दिवशी जिथे सुमारे 1000 पर्यटकांची नोंद व्हायची, तिथे आता जवळपास 1500 पर्यटक येत आहेत.
स्थानिक प्रशासकीय नोंदीनुसार वीकेंडला हा आकडा कधीकधी 4000 ते 5000 च्या घरातही पोहोचत आहे, जे सामान्य दिवसांपेक्षा खूप जास्त आहे. माळवली रेल्वे स्टेशनवरून अगदी जवळ असलेल्या या किल्ल्यावर केवळ या मर्डर स्पॉटला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे.
( नक्की वाचा : Siya Goyal: सिया आणि केतनच्या कारमध्ये काय घडलं? ड्रायव्हरने पाहिलेला तो सीन सियाला जेलमध्ये सडवणार! )
इतिहासप्रेमींमधून तीव्र संताप
पर्यटकांच्या या वाढत्या गर्दीमुळे आणि सोशल मीडियावरील ट्रेंडमुळे इतिहासप्रेमी आणि गडप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सुमारे 2000 वर्षांचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याचे नाव अशा प्रकारे एका क्रूर हत्याकांडाशी जोडले जाणे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक असल्याचं इतिहासप्रेमींची भावना आहे.सातवाहनांच्या काळापासून इतिहास असलेल्या या लोहगडाबाबत सोशल मीडियावर बनवले जाणारे मीम्स आणि विनोद हे किल्ल्याच्या अस्मितेला धक्का पोहचवणारे आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world