Kunal Shah WhatsApp Head: मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी) विषयाची पदवी घेणारा आणि पुढे मॅनेजमेंटचे शिक्षण अर्धवट सोडणारा एक मराठी तरुण आज जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. जगातील आघाडीची कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सने एक मोठा निर्णय घेत, प्रसिद्ध भारतीय फिनटेक स्टार्टअप क्रेडचे (CRED) संस्थापक आणि मुंबईकर कुणाल शाह यांची व्हॉट्सअपचे नवे जागतिक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
या ऐतिहासिक करारांतर्गत मेटा कंपनीने क्रेडमध्ये तब्बल 900 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,550 कोटी रुपयांची अवाढव्य गुंतवणूक केली असून, याद्वारे क्रेडमधील 20 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. गेल्या 7 वर्षांपासून व्हॉट्सअपचे नेतृत्व करणाऱ्या विल कॅथकार्ट यांच्या जागी आता मुंबईचे कुणाल शाह हे व्हॉट्सअपचा संपूर्ण जागतिक कारभार सांभाळणार आहेत.
मेटाकडून क्रेडमध्ये मोठी गुंतवणूक आणि हिस्सेदारी
या अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी करारानुसार, मेटा कंपनीने केलेल्या गुंतवणुकीमुळे क्रेडचे एकूण मूल्यांकन आता तब्बल 43,239 कोटी रुपये (सुमारे 4.5 अब्ज डॉलर्स) झाले आहे. या प्रक्रियेनंतर कुणाल शाह हे क्रेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून पायउतार होणार असून, ते मेटाच्या जागतिक नेतृत्व संघात (ग्लोबल लीडरशिप टीम) सामील होतील. दुसरीकडे, व्हॉट्सअपचे मावळते प्रमुख विल कॅथकार्ट हे आता मेटा कंपनीच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रकल्पांवर काम करणार आहेत.
( नक्की वाचा : एका चुकीमुळे गेली ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची खुर्ची! कीर स्टार्मर यांच्या राजीनाम्याचं 'एपस्टीन कनेक्शन' काय? )
शाह यांच्यावर जबाबदारी काय?
मेटा कंपनीने स्पष्ट केले आहे की, कुणाल शाह यांच्यावर व्हॉट्सअपला विकासाच्या पुढच्या टप्प्यावर नेण्याची मोठी जबाबदारी असेल. यामध्ये प्रामुख्याने व्हॉट्सअपच्या माध्यमातून जाहिराती आणि सबस्क्रिप्शन उत्पादनांद्वारे महसूल वाढवणे, तसेच या मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये एआय (AI) एजंट्सचा प्रभावी वापर करणे या गोष्टींचा समावेश आहे.
कुणाल शाह यांनी क्रेडच्या दैनंदिन कामकाजातून निवृत्ती घेतल्यानंतर, 2020 पासून कंपनीची रणनीती आणि वित्त विभाग सांभाळणारे मितेन संपत यांच्याकडे तात्पुरत्या काळासाठी क्रेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा प्रभार सोपवण्यात आला आहे.
( नक्की वाचा : FIFA World Cup 2026: मैदानात इतिहास, मैदानाबाहेर छळ; इराणच्या प्रशिक्षकाने फिफाची लक्तरे वेशीवर टांगली )
क्रेडचा यशस्वी प्रवास आणि नफा
सन 2018 मध्ये सुरू झालेल्या क्रेड या स्टार्टअपची सुरुवात सुरुवातीला क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणाऱ्या युजर्सना बक्षीस (रिवॉर्ड्स) देण्यापासून झाली होती. आज ही कंपनी पेमेंट, कर्ज, विमा, संपत्ती व्यवस्थापन (वेल्थ मॅनेजमेंट) अशा अनेक आर्थिक सेवा पुरवणारे देशातील एक मोठे प्लॅटफॉर्म बनली आहे.
सध्या क्रेडचे दरमहा 1.7 कोटी सक्रिय सदस्य आहेत आणि भारतातील क्रेडिट कार्ड बिलांच्या एकूण पेमेंटपैकी तब्बल 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार एकट्या क्रेडवरून होतात. क्रेडचा वार्षिक महसूल सध्या 3,200 कोटी रुपयांच्या घरात असून, कंपनी आता फायद्यात म्हणजेच नफ्यामध्ये आली आहे.
कोण आहेत मुंबईकर कुणाल शाह?
कुणाल शाह हे भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी आणि स्टार्टअप गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) मधून आपले पुढील शिक्षण सुरू केले होते, परंतु ते त्यांनी अर्धवट सोडले.
कुणाल यांनी 2010 मध्ये फ्रीचार्ज (FreeCharge) या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती, जी पुढे 2015 मध्ये स्नॅपडीलने सुमारे 450 दशलक्ष डॉलर्सना खरेदी केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचे 1 दशलक्ष डॉलर्स लावून क्रेडची स्थापना केली होती. याशिवाय कुणाल शाह यांनी अनॲकॅडमी, रेझरपे, स्पिनी आणि मोबाईल प्रिमियर लीग (MPL) यांसारख्या अनेक मोठ्या स्टार्टअप्समध्ये वैयक्तिक गुंतवणूक देखील केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world