महाविकास आघाडीत अजूनही काही जागांवरून वाद आहे. त्याजागा वरून चर्चा सुरू असतानाच तिथं उमेदवार जाहीर करण्यात आल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. सांगलीच्या जागेवर शिवसेनेनं उमेदवार जाहीर केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं भिवंडीतला उमेदवार जाहीर केला. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे. भिवंडीत स्थानिक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांबरोबर शरद पवारांसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.
शरद पवारांच्या उमेदवाराला विरोध
भिवंडी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पारंपारीक मतदार संघ आहे. त्यावर काँग्रेसचाच दावा आहे. त्यामुळे तो कोणत्याही स्थितीत सोडणार नाही अशी थेट भूमिक काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार सुरेश तावरे यांनी कोकणातल्या सर्व नेत्यांसह पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. दोन दिवसात वरिष्ठांनी याबाबत निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. दुसऱ्या कुणाच्याही पालख्या काँग्रेस कार्यकर्ता वाहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचं ते म्हणाले.
हेही वाचा - वंचितचा उमेदवार थेट फडणवीसांच्या भेटीला? चर्चा काय झाली?
काँग्रेस उमेदवार अर्ज दाखल करणार
भिवंडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार अर्ज भरेल अशी माहितीही तावरे यांनी दिली आहे. काँग्रेसकडून दयानंद चोरघे हेच उमेदवार असतील असंही त्यांनी जाहीर केलं. कोकणातून काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. रायगड सोडली, रत्नागिरी- सिंधुदुर्ग सोडली आता भिवंडी सोडणार नाही अशी काँग्रेस कार्यकत्यांची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आघाडीत बिघाडी होणार?
भिवंडी लोकसभेवर काँग्रेसचा शेवटपर्यंत दावा होता. दिल्लीत याबाबत चर्चा सुरू होती असं काँग्रेसकडून सांगितलं जात होतं. त्याच वेळी शरद पवारांनी बाळ्यामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भिवंडीतील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी थेट बंडाची भाषा केली आहे. काही झालं तरी काँग्रेसचा उमेदवार भिवंडीत असेल अशी वक्तव्य करण्यात आली आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारा विरुद्ध काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीतून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न आता काँग्रेस नेतृत्वा समोर आहे.
हेही वाचा - कल्याणची जागा कोण लढणार? फडणवीसांनी एका शब्दात विषय संपवला
सांगलीतही तिची स्थिती
भिवंडी प्रमाणे सांगलीतही पेच फसला आहे. या जागेवर काँग्रेसचा अजूनही दावा आहे. विशाल पाटील इथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. असं असताना शिवसेनेनं इथं आधीच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विश्वजित कदम सांगलीची जागा मिळावी म्हणून आग्रही आहेत. ही जागा शिवसेनेला सोडल्यामुळे त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. त्यात आता भिवंडीच्या जागेवरूनही पेच निर्माण झाला आहे. इथं स्थानिक काँग्रेस नेत्यांनी उमेदवार रिंगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world