राज्यातील वाढती बेरोजगारी दूर करणे सरकारसमोरील मोठं आव्हान आहे. रोजगार निर्मितीसोबतच तरुणांना रोजगारासाठी सक्षम करणे ही देखील सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळेच सरकारने अनेक कौशल्य विकास योजनांची सुरुवात केली आहे. या विविध योजनांद्वारे राज्यातील तरुणांना नोकरीसाठी सक्षम बनवले जाईल. याद्वारे राज्यातील जवळपास 10 लाख तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं की, राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर माझ्या मनात असलेल्या अनेक योजना मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर माझ्या कौशल्य विकास मंत्रालयामार्फत राज्यात नवीन 5 योजना आम्ही सुरु केल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढीस लागावे यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे देखील सुरू केली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते येत्या 19 सप्टेंबर रोजी वर्ध्यात सरकारी योजनांचं लोकार्पण होत आहे.
(नक्की वाचा- Railway Recruitment 2024: रेल्वेत होणार 14 हजार जागांची भरती, कशी मिळवणार नोकरी? A to Z माहिती)
तरुणांना परदेशात नोकरीसाठी सक्षम बनवणार
परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अॅकॅडमी, मुंबईतील विद्याविहार येथे सुरु करण्यात आली आहे. राज्यात पाच ठिकाणी अशा अॅकॅडमी सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. विद्याविहार येथील अॅकॅडमी पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. यामध्ये इस्रायल, जपान, जर्मनी अशा देशांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत. त्यामुळे अशा देशांमधील भाषा, संस्कृती यांचं शिक्षण आपण मुलांना देत आहोत. मुलांचे व्हिसा आणि प्रवासाचा खर्च आपण केंद्र सरकारच्या मदतीने करतो. मुलांसोबत यामध्ये कोणतीही फसवणूक होणार नाही, याची शाश्वती देखील मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
ठाण्यात आपण संत गाडगेबाबा स्वच्छता अॅकॅडमी सुरु केली आहे. दर महिन्याला येथे 300 विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षण दिलं जातं. बीव्हीजी कंपनीकडून प्रत्येक मुलाला किमान 25 हजारांची नोकरी येथून मिळणार आहे. याबाबत कंपनीसोबत आमचा करार झाला आहे. मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाखो मुलांना आपण रोजगार देणार आहोत. याद्वारे आतापर्यंत 48 हजार तरुणांना नोकरी मिळाली आहे, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
येत्या 1 सप्टेंबरपासून योजनांचा प्रचार करणार
जिथे शिक्षण देत आहोत, तिथूनच नोकरी मिळणार आहे. अनेक चांगल्या कंपन्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहे. सरकारी योजनांचा माहिती तरुणांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयात जाहिराती लावल्या जाणार आहेत. याशिवाय प्रसारमाध्यमातून प्रचार केला जाणार आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून तरुणांपर्यंत या योजनांची माहिती पुरवण्यासाठी तयारी सुरु केली जाणार आहे, असंही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
कुणाला होणार फायदा?
राज्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये कोशल्य विकास केंद्रे उभारण्यात आले आहेत. तिथेही कोणतीही वयोमर्यादा नाही. मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना सोडल्यास इतर कोणत्याही योजनेसाठी सरकारकडून वयोमर्यादेची अट नाही. नोकरीदेखील या तरुणांना मिळणार आहे. सरकारच्या या कौशल्य योजनांचा जवळपास 10 लाख तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. मोठमोठ्या कंपन्या तरुणांना सरकारच्या माध्यमातून नोकऱ्या देत आहेत.