विशाल पाटील, मुंबई
मुंबईत मोनोरेल प्रकल्पाला सुरुवातीपासूनच अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. वारंवार होणारे बिघाड, ट्रॅकवर गाड्या अडकणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या तक्रारींमुळे अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) 20 सप्टेंबर 2025 पासून मोनोरेल सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले की, या कालावधीत मोनोरेलचे आधुनिकीकरण, नवीन रोलिंग स्टॉकची बसवणी आणि प्रगत CBTC सिग्नलिंग सिस्टमचा समावेश केला जाणार आहे. हैदराबादमध्ये विकसित ही स्वदेशी प्रणाली प्रथमच मुंबई मोनोरेलमध्ये वापरली जाणार आहे.
मोनोरेलची आर्थिक चित्र
20 किमी लांबीच्या मोनोरेल मार्गिकेवर दिवसाला फक्त 19 हजार प्रवासी प्रवास करतात. तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न व खर्च यामध्ये प्रचंड तफावत आहे. मात्र तोट्यात असला तरी मोनोरेलला अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवून प्रवाशांचा विश्वास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न एमएमआरडीए करत आहे.
Mono Rail
वर्ष | उत्पन्न (कोटी) | खर्च (कोटी)) |
2014-15 | 4.20 | 18.86 |
2015-16 | 4.36 | 21.58 |
2016-17 | 4.11 | 20.47 |
2017-18 | 2.33 | 17.99 |
2018-19 | 2.54 | 20.23 |
2019-20 | 7.05 | 94.34 |
2020-21 | 1.03 | 81.61 |
2021-22 | 2.65 | 68.27 |
नवीन मोनोरेल रेक्सची वैशिष्ट्ये
- ‘मेक इन इंडिया' अंतर्गत तयार होणारे 10 नवीन मोनोरेल रेक्स (प्रत्येकी 4 कोचेस) मुंबईत धावणार आहेत. त्यामध्ये एकूण 21 महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत:
- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अग्निसुरक्षा (EN-45545, HL3)
- प्रत्येक कोचमध्ये CCTV देखरेख यंत्रणा
- दिव्यांगांसाठी आसने, प्रवाशांसाठी 230V AC चार्जिंग सुविधा
- बहुभाषिक प्रवासी माहिती प्रणाली, डायनॅमिक रूट मॅप
- पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर – हलकी व कार्यक्षम
- आग शोध यंत्रणा, बिअरिंग व टायर प्रेशर मॉनिटरिंग
- मेट्रोप्रमाणे आधुनिक इंटिरियर्स, एलईडी लाइट्स व ऑटो डिमर कंट्रोल
- भारतात निर्मित असल्याने सुटे भाग सहज उपलब्ध
आधुनिकीकरणाचा रोडमॅप
- CBTC सिग्नलिंग सिस्टम : 5 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग्स, 260 वाय-फाय पॉइंट्स, 500 RFID टॅग्स आणि 90 ट्रेन डिटेक्शन यंत्रणा बसवली असून टेस्टिंग सुरू.
- जुन्या रेक्सचे नूतनीकरण : जुने रेक्सही नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जातील.
- नवीन रोलिंग स्टॉकचे इंटिग्रेशन : प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर करण्यासाठी एकत्रित चाचण्या सुरू आहेत.