प्रेमसंबंधाची आणखी एक बळी; नवी मुंबईत 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह पाहून परिसरात खळबळ

मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती फॉरेन्सिक टीमकडून मिळत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

उरण येथील 20 वर्षीय यशश्री शिंदे हिच्या हत्येची घटना नवी मुंबईकरांच्या मनात ताजी असतानाच बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सीवूड, येथील आणखी एका 19 वर्षीय तरुणीचा डी.पी.एस शाळेच्या पाठीमागे असलेल्या तलावात एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी हा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना खबर दिली.  हा मृतदेह नेरूळ येथील भाविका मोरे या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा असून, तिचे पनवेल येथील स्वस्तिक पाटील या 22 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

प्रथमदर्शनी, मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती फॉरेन्सिक टीमकडून मिळत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.  पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांना हे जोडपं दुपारी चार वाजताच्या सुमारास दुचाकीवरून तलावाकडे जाताना आढळले, परंतु मुलगा परत येताना आढळला नाही.

नक्की वाचा - अवैध सावकारीचा फास ! त्याने एकाला नाही तर अनेकांना लुटले, थरकाप उडवणारी वसूली

 त्यामुळे त्यानेही मुलीचा गळा आवळून तलावात उडी मारल्याचा संशय आहे.  तलाव खाडीला जोडलेला आहे आणि जर मुलाचा मृतदेह खूप पुढे गेला असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक मच्छीमारांच्या बोटी त्याचा शोध घेत आहेत. नवी मुंबई पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच एनआरआय कोस्टल पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि या दोघांमध्ये भांडण झाले असावे असा संशय आहे. तरुण बेपत्ता असल्याकारणाने नेमक्या कारणाचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. तरुणीला एक बहीण आणि आई आहे, तर वडिलांचं निधन झालंय.  आई आणि तिचा भाऊ उपजीविकेसाठी फोटो स्टुडिओ चालवत होते. 

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील व मोरे या दोघांच्याही कुटुंबीयांचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली असून त्यांना या प्रेमसंबंधाबाबत माहिती नव्हती. नवी मुंबई एनआरआय कोस्टल पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याची औपचारिकता सुरू केली आहे. पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन व नवी मुंबई क्राईम ब्रँच करत आहेत .