Palghar News : सहकाऱ्यांसोबत पायी तीर्थयात्रेवर निघालेल्या २१ वर्षीय जैन भिक्षू यांच्या मृत्यूने जैन समाजात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नम्ररत्न महाराज आणि त्यांचे सहकारी सफाळ्यातील प्रतापधाम सतीवलीहून विरारहून पुढे असलेल्या महावीरधाम शिरसाद तीर्थक्षेत्राच्या दिशेने पुढे निघाले. त्यावेळी त्यांच्यासोबत अघटित घडलं अन् यात त्यांचा मृत्यू झाला.
नम्ररत्न विजय यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
जैन भिक्षू नम्ररत्न विजय मूळ गुजरातचे निवासी होते. पहाटे ५.१५ च्या दरम्यान ते विरारजवळील भालीवली पुलाजवळ होते. त्याचवेळी राजमार्गाच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुजरातहून वेगाने येणाऱ्या चारचाकी गाडीला एका ट्रकने धडक दिली होती. यानंतर चारचाकीचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट जैन भिक्षूला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, गंभीर जखमी झालेल्या भिक्षूंना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्र्क आणि कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुखद घटनेनंतर जैन समुदायात शोक व्यक्त केला जात आहे. मुनिराज नम्ररत्न यांनी २०२० मध्ये धर्मसूरी संप्रदायातून दीक्षा घेतली होती. त्यावेळी ते १५ वर्षांचे होते. त्यांनी दीक्षा घेऊन नेमके सहा वर्ष एक दिवस पूर्ण झाले आहेत. इतक्या कमी वयात ते दीक्षा घेऊन महाराज झाले आणि सहा वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने समाजातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world