साजन धाबे, प्रतिनिधी
Washim Heatwave News : वाशिम जिल्ह्यात सध्या वाढत्या तापमानाचा तीव्र परिणाम जाणवत असून उष्माघातामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. डोंगरकीन्ही येथील 25 वर्षीय गोपाल ठाकरे यांचा शेतात दुर्देवी मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,गोपाल ठाकरे हे शेतकरी कुटुंबातील असून गेल्या दोन दिवसांपासून ते त्यांच्या शेतात हळद घासण्याच्या कामात मदत करत होते.उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाही ते भर दुपारच्या वेळेत शेतात काम करत होते.
आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास काम सुरू असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले.आसपासच्या नागरिकांनी आणि नातेवाईकांनी तातडीने त्यांना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.
नक्की वाचा >> Sangamner News: "मंत्राने कर्करोग बरा करतो..", भक्तांना लुटणाऱ्या राजेंद्र गडगे महाराजला पहाटेच्या वेळी अटक
डोंगरकीन्ही गावात पसरली शोककळा
मात्र,उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार उष्मघातामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान,या घटनेमुळे डोंगरकीन्ही गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> Ambarnath News: अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात भयंकर घटना, पोलिसांनाही धक्काबुक्की, Video व्हायरल
उष्णतेचा वाढता धोका
वाशिम जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.अशा परिस्थितीत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे,पुरेसे पाणी पिणे,डोक्यावर संरक्षण ठेवणे यांसारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.