
विशाल पाटील, मुंबई
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील महामार्गाचं काम 99 टक्के पूर्ण झालं आहे. या महामार्गातील अखेरच्या टप्प्यात असलेला 8 किमी लांबीचा बोगदा हा या चौथ्या टप्प्याचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. यामुळे 12 किमीच्या कसारा घाटाची गरज लागणार नाही. तसेच हे अंतर अवघं आठ मिनिटांत कापलं जाणार आहे.सर्वात आव्हानात्मक असणारा हा बोगदा कसा आहे पाहुया.
समृद्धी महामार्गाचा हा चौथा टप्पा कसा आहे?
समृद्धी महामार्गाचा 76 किमीचा अखेरचा टप्पा 99 टक्के पूर्ण झालं आहे. नागपूर ते मुंबई हे अंतर आठ तासांत कापता यावं यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. नागपूर ते मुंबई असा 701 किमीचा हा महामार्ग आहे. 701 किमी महामार्गापैकी 625 किमीचा महामार्ग म्हणजेच नागपूर ते इगतपुरी हा लोकांच्या सेवेत दाखल झाला. आता उर्वरित 76 किमीचा महामार्ग 99 टक्के पूर्ण झाला आहे.
(नक्की वाचा- लोकसभेच्या निकालानंतर महायुती सरकार 'टॉप गियर'वर; योजना, विकासकामांचा धडाका)
चौथ्या टप्प्यातील या महामार्गावर पाच बोगदे आणि १६ पूल असणार आहेत. यामुळे कसारा घाट लागणारच नाही. इगतपुरी ते आमणे या समृद्धी महामार्गावरील चौथ्या टप्प्यातलं सर्वात मोठं आकर्षण काय असेल तर ते म्हणजे आठ किमीचा बोगदा. या बोगद्यामुळे कसारा घाट लागणार नाही. तसेच कसारा घाटाचं सध्याचं अंतर 12 किमी आहे जे कापण्यासाठी 40 मिनिटं लागतात. मात्र समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या बोगद्यातून गेलेल्या मार्गामुळे हे अंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटात कापलं जाणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा
समृद्धी महामार्गावरच्या चौथ्या टप्प्यातला मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांना जोडतो. सह्याद्रीच्या खडतर पर्वत रांगांमधून मार्ग काढून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केलं आहे. इगतपुरी येथील 8 किमीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. तसेच देशातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. या बोगद्याची रुंदी 17.61 मीटर इतकी आहे. तर या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर 8 ते 10 मिनिटात पार करता येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 नाशिकला जोडणाऱ्या कसारा घाटाला पर्यायी मार्ग झाल्याने वाहतूक जलद होणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या या अखेरच्या टप्प्यात व्हॅली पूल बांधणं आणि बोगदे बांधणं हे सर्वात जिकिरीचं काम होतं. काही ठिकाणी खडकांत 30 ते 40 मीटरपर्यंत खोदकाम करावं लागलं. या टप्प्यात 16 व्हॅली पूल आहेत पॅकेज 15 मध्ये खोल दरी असल्याने पुलाच्या खांबांची उंची 84 मीटर आहे म्हणजेच एखाद्या 25 ते 28 मजली इमारती इतकी आहे.
(नक्की वाचा- 'सांगली पॅटर्न'ची आठवण करुन द्या, शिवसेनेच्या आक्रमकतेला आवर घालण्यासाठी काँग्रेस हायकमांडचे आदेश?)
समृद्धी महामार्गाचे कोणते तीन टप्पे वाहतुकीसाठी खुले?
पहिला टप्पा : नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा महामार्ग 11 डिसेंबर 2022 ला वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
दुसरा टप्पा : शिर्डी ते भरवीर हा 80 किमीचा मार्ग 26 मे 2023 या दिवशी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
तिसरा टप्पा : 4 मार्च 2024 या दिवशी भरवीर ते इगतपुरी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
4 ऑगस्ट 2024 पर्यंत या महामार्गावरुन 1 कोटी 18 लाख वाहनांनी सुरक्षित प्रवास केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world