जाहिरात

मोठी संधी! 75,000 प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण, 'असा' करा अर्ज

या कार्यक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

मोठी संधी! 75,000 प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण, 'असा' करा अर्ज
मुंबई:

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना उद्योग सुसंगत आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या  उद्देशाने ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यभरात 600 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना विश्‍वकर्मा समाजातील कारागीर, स्थानिक कलाकार व पारंपरिक व्यवसायातील तज्ज्ञ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाईल. या माध्यमातून त्यांच्या योगदानाला सन्मान मिळेल आणि समाजातील पारंपरिक कौशल्यांविषयी आदरभाव वाढेल.

या कार्यक्रमांतर्गत राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 141 शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण 2,505 तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून चालू वर्षात 75,000 प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुढील वर्षापासून ही संख्या एक लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प विभागाने केला आहे. या उपक्रमाद्वारे कौशल्य शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्यात येत असून, अभ्यासक्रमांची निवड स्थानिक मागणी व जनहिताच्या आवश्यकतेनुसार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील संस्था व्यवस्थापन समित्या स्थानिक पातळीवर हे अभ्यासक्रम चालविणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व बाबींमध्ये स्थानिक सहभाग व उत्तरदायित्व वाढणार आहे. 

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार

मंत्री लोढा म्हणाले की, उद्योगांच्या बदलत्या मागणीनुसार राज्यातील युवकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. ग्रामीण भागातील युवक तसेच महिला उमेदवारांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. असं ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. प्रशिक्षण शुल्क प्रति महिना रुपये एक हजार ते पाच हजार इतके निश्चित करण्यात आले आहे. 25 टक्के जागा संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, उर्वरित जागा बाह्य उमेदवारांसाठी खुल्या असतील. या अभ्यासक्रमांसाठी आयटीआयमधील विद्यमान व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच दहावी, बारावी, पदविका किंवा पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पात्र असतील.

नक्की वाचा - Pune News: फक्त 90 मिनिटांत मुंबई-पुणे प्रवास! पुण्यात जाण्यासाठी तिसरा ‘सुपरफास्ट' महामार्ग लवकरच

या कार्यक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असून, त्यात अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञ, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर इत्यादी विषयांचा समावेश आहे. महिला उमेदवारांसाठी 364 विशेष बॅचेस तसेच उदयोन्मुख क्षेत्रांसाठी 408 विशेष बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत. गडचिरोली, लातूर, नागपूर आणि अमरावती येथे स्थानिक उद्योग गरजांनुसार विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असून, नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” हा विशेष अभ्यासक्रमही राबविण्यात येईल.अधिक माहितीसाठी  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नोंदणी संकेतस्थळ : https://admission.dvet.gov.in 
जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासकीय तांत्रिक विद्यालयात संपर्क साधावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com