"उभा राहू का?"; सयाजी शिंदेंच्या प्रश्नावर अजित पवारांचं थेट उत्तर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सयाजी शिंदे यांच्या प्रवेशाने ते निवडणूक लढणार की नाही याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. याबाबत अजित पवार यांना व्यासपीठावरुन स्पष्टीकरण दिलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सयाजी शिंदे यांच्या प्रवेशाने ते निवडणूक लढणार की नाही याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. याबाबत अजित पवार यांनी व्यासपीठावरुन स्पष्ट केलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

झालं असं की पक्षप्रवेशानंतर बोलताना सयाजी शिंदे यांनी बसून बोलू की उभं राहू असा सवाल उपस्थितांना केला. त्यावेळी पत्रकांनी त्यांना सवाल केला की तुम्ही उभे राहणार (निवडणुकीत) आहात का? पत्रकारांच्या या प्रश्नावर अजित पवारांनीच उत्तर दिलं. सयाजी शिंदे उभे राहणार आहेत. मात्र ते प्रचारसभेच्या निमित्ताने उभे राहणार आहेत. सयाजी शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली. 

सिनेमात मी नेत्यांच्या, गृहमंत्र्यांच्या आणि विलनच्या भूमिका केल्या. गेल्या वर्षांपासून मी राज्यभर वृक्षारोपणाचं आणि पर्यावरणाचं काम करत आहे. नेहमी मला काही अडचण आली की अजित पवारांना भेटायचो. मी 25 वेळा मंत्रालयात गेलो तर त्यापैकी 15 वेळा मी अजितदादांनाच भेटलो असेन. दादांना भेटायचं म्हणजे भल्या पहाटे आणि वेळेचं भान ठेवावं लागायचं. त्यामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच मला आदर वाटला. अचानक ठरलं की राजकारणात गेलं पाहिजे. बरेच प्रश्न सिस्टिममध्ये राहून सोडवावे लागतील. त्यावेळी अजित पवारांचं नाव डोक्यात आलं, असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा-  अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? शिवसेना शिंदे गट 'ही' जागा सोडण्यास तयार?)

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवारांना म्हटलं की, मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण मी सयाजीरावांचे काही सिनेमे पाहिले आहे. सयाजीरावांनी आपला वेगळा ठसा सिनेसृष्टीत निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात ठसा उमटवला तर अभिमान वाटतो. सयाजी शिंदे यांचे चित्रपट जागरूकता निर्माण करतात. त्यांनी सामाजिक कार्यातही मोठं काम केलं आहे. 

सत्तेत असताना अनेक लोक भेटायला येतात. सयाजी शिंदे यांना झाडांची खूप आवड आहे. राज्यभर ते झाडे लावण्याचं काम करत आहे. मी त्यांचं काम जवळून पाहिलं आहे. त्यांना अनेक गोष्टी आम्हाल सूचवल्या. सिद्धिविनायक, साईबाबा अशा अनेक मंदिरात आपण लोकांना प्रसाद म्हणून रोपटं दिलं पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक चांगल्या गोष्टी त्यांना मला सांगितलं.

(नक्की वाचा- 'मी नक्कीच मुख्यमंत्री होणार' दावा कोणाचा? प्रतिक्रिया काय आली?)

सयाजीरावांचं पक्षात सामील होणं मोठं पाऊल आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सयाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबद्दल आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सयाजी शिंदे यांचा योग्य आदर आणि सन्मान राखला जाईल, असंही अजित पवारांना स्पष्ट केलं.