मोठी बातमी : अदाणी समुहाच्या मदतीनं पनवेलमध्ये उभा राहणार अतिविशाल सेमी कंडक्टर प्रकल्प

Semi Conductor project Panvel : टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदाणी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या प्रकल्पामुळे 15 हजार जणांना रोजगार मिळणार आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

नव्या जगाची ओळख आणि गरज असलेल्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य होणार आहे. या क्षेत्रातील 4 विशाल प्रकल्पांना राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवार, 5 सप्टेंबर) उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामध्ये पनवेलमधील अतिविशाल सेमी कंडक्टर प्रकल्पाचा समावेश आहे. टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदाणी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या प्रकल्पामुळे 15 हजार जणांना रोजगार मिळणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकल्प?

टॉवर सेमी कंडक्टर कंपनी आणि अदाणी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये होणार आहे. या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात 58 हजार 763 कोटी तर दुसऱ्या टप्यात रूपये 25 हजार 184 कोटी अशी एकूण 83 हजार 947 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याप्रकल्पामुळे 15 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.

आणखी कोणत्या प्रकल्पांना मान्यता?

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे 1 लाख 17 हजार 220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित 4 विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. या चार प्रकल्पांमुळे एकूण 29 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. 

( नक्की वाचा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 8 निर्णय, मराठवाडा-विदर्भाला होणार मोठा फायदा )
 

दरम्यान, 30 जुलै 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सेमीकंडक्टर निर्मितीच्या अतिविशाल प्रकल्पास  मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प सेमीकंडक्टर निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये लवकरच ओसॅट, चिप्स निर्मिती सुरू होणार आहे. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स व टॉवर सेमीकंडक्टर कंपनी यांच्या प्रकल्पांमुळे प्रगत सेमीकंडक्टरची निर्मिती होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात महाराष्ट्र  भारताच्या अग्रस्थानी राहणार आहे. देशातील वाढती मागणी पुर्ण करणे आणि सेमीकंडक्टरची इकोसिस्टीम स्थापित करण्यास देखील चालना मिळणार आहे.

Advertisement

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प पुणे येथे एकात्मिक पध्दतीने स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 12 हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे एक हजार रोजगार निर्मिती होणार असून प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक व्हेईकलचे निर्मिती केली जाणार आहे.  

( नक्की वाचा : ठाणेकरांसाठी गुडन्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, क्लस्टर योजनेला गती मिळणार )
 

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा प्रकल्प राज्याचे इलेक्ट्रीक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 21 हजार 273 कोटी एवढी गुंतवणूक होणार असून त्यामाध्यमातून 12 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होण्यास मदत होणार आहे.  

Advertisement

मराठवाडयातील सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. इलेक्ट्रीक वाहनाच्या वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊन हवेची गुणवत्ता आणि हवामान बदल कमी होण्यास हातभार मिळणार आहे. 

यापूर्वी जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी यांचा छत्रपती संभाजीगनर येथे इलेक्ट्रीक वाहन निर्मितीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर यांचा इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये  मोठया प्रमाणात गुंतवणूक होणारा छत्रपती संभाजीनगर येथील दुसरा अतिविशाल प्रकल्प असून या क्षेत्राचा सर्वंकष विकास  होण्यास चालना मिळणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय )
 

रेमंड लक्झरी कॉटन्स यांचा वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्पिनींग, यार्न डाइंग, विव्हींग ज्यूट, विव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन ह्या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ नांदगाव पेठ, जि.अमरावती येथे होणार आहे. याप्रकल्पात 188 कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.

आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.  यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे हे या बैठकीला उपस्थित होते.