शरद पवारांच्या भेटीचं भुजबळांनी न सांगितलेलं 'राजकारण'; एका पत्रकार परिषदेचे अनेक अर्थ...

छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेचे अनेक अर्थ काढले जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

अजित पवार तिसरी आघाडी उभी करणार असल्याची चर्चा सुरू असताना छगन भुजबळ यांनी अचानकपणे शरद पवारांची भेट घेतली. यानंतर राजकीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे भेटीनंतर अवघ्या काही वेळात त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. 

छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेचे अनेक अर्थ काढले जात आहे. पत्रकार परिषदेच्या आधीपर्यंत छगन भुजबळ तिसऱ्या आघाडीच्या मुद्द्यावरून नाराज असल्याने मोठी भूमिका घेऊ शकतात असं म्हटलं जात होतं. त्यामुळे सर्वांचंच भुजबळांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष होतं. छगन भुजबळांनी  ओबीसी-मराठा वाद सोडविण्यासाठी थेट शरद पवारांचं घर गाठलं. यावेळी त्यांच्यामध्ये अनौपचारिकपणे चर्चा झाल्याचं भुजबळांनी स्वत: सांगितलं.

1 भुजबळांनी आपली ओबीसी प्रतिमा आणि सामाजिक सलोखा राखण्याची भूमिका आखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. 

2 लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीने जो राजकीय पट मांडला त्यातील महत्त्वाचं पाऊल आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विरोधक फायदा घेत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्राचे जाणकार नेते असलेले शरद पवार यांनाच हा मुद्दा सोडवायचा नसल्याचं नरेटिव्ह महायुतीकडून सेट केला जात आहे. राज्य सरकारने जरांगेंनी डेडलाइनपूर्वी एक बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला विरोधी पक्षाचा एकही नेता उपस्थित राहिला नव्हता. त्यामुळे विरोधक महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचा फायदा घेत असल्याचं नरेटिव्ह सेट केलं जात असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

3 छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत असल्याचं अजित पवारांना सांगितलं नाही, तर त्यांनी प्रफुल पटेलांना सांगितलं. प्रफुल पटेल यांचे दिल्लीतील भाजपशी चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आगामी विधानसभेसाठी भाजपचा प्लान ठरल्याचं विश्लेषण राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

Advertisement

4 महाराष्ट्रातील सामाजिक राजकारण जितकं पवारांना समजतं तितकचं भुजबळांनाही समजतं हे आजच्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट होतंय. सत्ताधाऱ्यांची सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची भूमिका असली तरी विरोधी पक्षांनीही या विषयांवरील आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी महायुतीकडून विविध पद्धतीने दबाव आणला जाऊ शकतो. राज्यातील ओबीसी-मराठा वाद विरोधकांसाठी फायदेशीर ठरतोय असं दिसतंय. महायुतीला लोकसभेत याचा फटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अडचणीचे ठरणारे प्रश्न सोडविताना ओबीसी-मराठा मुद्द्यावरून विरोधी पक्षांनाच घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

5 मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रकरणात शरद पवारांची महत्त्वाची भूमिका होती. राज्यातील ज्येष्ठ आणि जाणकार नेता राज्याला ढवळून टाकणाऱ्या ओबीसी-मराठा वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचं नरेटिव्ह महायुतीकडून तयार केलं जात आहे. या प्रकरणात शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

6 शरद पवार पुढील दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं छगन भुजबळ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. 

Advertisement

7 शरद पवारां इतका महाराष्ट्र कुणाला कळत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे शेवटी महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवारांची गरज लागली अशीही प्रतिक्रिया काही राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ओबीसी-मराठा वाद सोडविण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा अशी भूमिका छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.