- अजित पवार यांचे अस्थी विसर्जन विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर तिसऱ्या दिवशी धार्मिक विधींनुसार पार पडले
- अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्र केल्या होत्या, ज्यापैकी एक कलश काटेवाडी येथील घरी ठेवण्यात येणार आहे
- अजित पवारांच्या एका अस्थी कलशाचे विसर्जन कऱ्हा-नीरा नदी संगमावरही झाले
देवा राखुंडे
अजित पवार पंचतत्वात विलीन झाले. आज तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने अजितदादांच्या अस्ति विसर्जनाचा कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर करण्यात आला. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी धार्मिक विधींनुसार अजित पवारांच्या अस्थी संकलित केले. शरद पवार देखील अस्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अजित दादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार, चुलत भाऊ राजेंद्र पवार, रणजित पवार, आमदार रोहित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं.
यावेळी शरद पवार आणि नातवांमधला जिव्हाळा दिसून आला. अस्थी सावडण्याचा विधी सुरू असतानाच शरद पवार दाखल झाले. यावेळी पार्थ पवारांनी शरद पवारांना हाक मारून थांबायला सांगितलं. पार्थ पवार अस्थी सोबत घेऊन चौथऱ्यावरून खाली उतरले आणि शरद पवारांनी थरथरत्या हातांनी अस्थी सावडण्याचा विधी केला.आज सकाळी अजित पवारांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात आल्या. यापैकी एक कलश अजितदादांच्या मूळ गावी काटेवाडी येथील घरी ठेवला जाईल.
तर एका कलशामधील अस्थींचं विसर्जन कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर करण्यात आलं. संपूर्ण पवार कुटुंब अस्थि विसर्जनासाठी नदी किनाऱ्यावर आलं होतं. सर्वजण एकाच बोटीत बसून दादांच्या अस्थिंचं विसर्जन करून आले. एका कलशामधील अस्थिंचं विसर्जन विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात केलं जाणार आहे. अजित पवारांचे झाडांवर विशेष प्रेम होतं. त्यामुळे विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या परिसरातील झाडांच्या मुळांशी अस्थी विखुरल्या जाणार आहेत.
याशिवाय दोन कलशांमधील अस्थींचे त्रिवेणी संगम प्रयागराज येथे विसर्जन केलं जाईल.तर काही अस्थी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत दर्शनासाठी पाठवल्या जातील. अजित पवारांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळी पसरवली होती. त्यांच्या मृत्यूला तीन दिवस झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने सावडण्याचा कार्यक्रम केला. त्यातून त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या आहेत.