Vitthal Maniyar| Sharad Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची बहीण सुप्रिया सुळे आणि पत्नी सुनेत्रा पवार ज्या वृद्ध व्यक्तीच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडत होत्या ते कोण आहेत, असा अनेकांना प्रश्न पडला होता. तर विठ्ठल मणियार असे त्यांचं नाव आहे, ते शरद पवार यांचे अतिशय जवळचे मित्र आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाते. विठ्ठल मणियार हे एक व्यापारी देखील आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांसह अन्य सदस्यांची काय मनस्थिती आहेत, यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर NDTV मराठीने त्यांच्याशी बातचित केलीय, जाणून घेऊया सविस्तर...
"अजितला परत आणता येणार नाही..."
विठ्ठल मणियार म्हणाले की, एकतर हे इतकं अचानक घडलंय की त्याची कोणीही कल्पना करू शकत नाही. हा धक्का जसा सर्वांना बसलाय तसा साहेबांना बसणं स्वाभाविक आहे. हे घडल्यानंतर साहेबांनी स्वतःला सावरलं आणि सावरुन हा विचार केला की याच्यातून आपल्याला पुढे जायला पाहिजे. जी गोष्ट घडून गेलीय ती काही परत आणता येणार नाही. अजितला परत आणता येणार नाही. कुटुंबाला धक्क्यातून बाहेर काढणं, ही त्यांच्यासमोर पहिली प्राथमिकता आहे. एक ज्येष्ठ व्यक्ती या नात्याने ते स्वतः असे मानतात की मीच जर ढासळलो तर बाकीच्यांचे काय? विशेषतः अजितची पत्नी -मुलं आहेत. या सर्वांकडे पाहून साहेबांनी स्वतःचं दुःख गिळलं, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आतून ते कोलमडले आहेत, चेहऱ्यावर ते दिसतंय, पण ते दाखवत नाहीयेत. हे सर्व सहन करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे".
(नक्की वाचा: Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांबाबत अजित पवारांना काय वाटतं? जास्त बोलणं टाळलं अन्... सोशल मीडियावर रंगलीय चर्चा)
अजित पवारांना वडिलांचे प्रेम दिलं
अजितचे वडील लवकर गेले, यानंतर अजित आणि धाकटा भाऊ श्रीनिवास यांची अतिरिक्त जबाबदारी शरद पवारांवर आली. या दोघांचं करिअर घडवण्याचा वसा साहेबांनी घेतला. वडिलांचे प्रेम त्यांना मिळालं नव्हते, अजितच्या जाण्यापर्यंत त्यांनी ते प्रेम दिलं. काका जरी म्हणत असला तरी तो त्यांना वडिलांच्या जागीच मानत होता. साहेब देखील अजितकडे पुतण्या म्हणून नाही तर मुलगा म्हणून अशाच नात्याने पाहत होते.
दुसरीकडे अजित पवारांना भाजपसोबत जाताना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण सत्ता नसेल तर आपल्याला लोकांची काम करता येत नाहीत. विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी म्हणून मी जातोय. फुले-आंबेडकरांचा वसा सोडत नाहीय, ज्यांच्यासोबत आहे त्यांची वस्त्र अंगावर चढवत नाही, अशी अजित पवारांची भूमिका होती. त्या भूमिकेतून गेल्यानंतर साहेबांनी सांगितलं की ठीकेय तुझ्या मार्गाने तू जा. पण जे काही करशील ते राष्ट्राच्या, राज्याच्या, लोकांच्या हिताचे कर. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला नाही. प्रत्यक्षात तसूभरही त्यांच्यातील प्रेम कमी झालेलं नाही, असेही मणियार यांनी सांगितले.
(नक्की वाचा: Ajit Pawar News:अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता तर... रावसाहेब दानवेंनी सांगितली Inside Story)
अजित पवारांनी ती इच्छा मणियार यांच्याकडे बोलून दाखवलीराष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही महिन्यांनी अजित पवार यांनी संवाद साधल्याचंही विठ्ठल मणियार यांनी सांगितले. याबाबत ते म्हणाले की, अजित पवार म्हणाले की, काका आम्ही सर्वांनी एकत्र राहणं मला गरजेचं वाटतंय आणि साहेबांनी आमच्यासोबत यावं, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, हे तुम्ही त्यांचे जवळचे मित्र या नात्याने सांगू शकला. राजकारणाशी तुमचा थेट संबंध नसल्याने तुम्ही जे साहेबांना सांगाल त्याच्यावर साहेब विचार करू शकतील, असे आम्हाला वाटतंय. अंकुश काकडे हे राजकारणात जरी असले तरी ते साहेबांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते आहेत. तर तुम्ही आणि अंकुश काकडेंनी साहेबांना भेटून सांगितलं तर कदाचित ते विचार करतील, असे मला वाटतं, अशी अजित पवारांनी मला विनंती केली होती. तर अजितशी माझं बोलणं झालं आणि त्याची अशी इच्छा असल्याचे मी साहेबांना सांगितलं. त्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं, काय नेमकं त्याचं म्हणणंय, काय त्याचं प्रपोजल आहे, असे प्रश्नही विचारले. मला जेवढं अजितने सांगितलं तेवढं मी त्यांना सांगितलं. पुढे माझा विषय तिथेच संपतो कारण राजकारणामध्ये मी भाग घेणारा माणूस नाही. तर पुढे मग त्या गोष्टीला चालना मिळाली आणि काही अंशी महापालिका निवडणुकांपूर्वी असे जाणवायला लागलं होतं की आता हे जुळतंय आणि कदाचित हे होईल. पण नियतील काही वेगळंच अपेक्षित होते, अचानक हे घडलं, पुढे काही माहिती नाही.
अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर शरद पवारांची भेट झाली पण बोलणं झालेलं नाही. मी देखील हॉस्पिटलमध्ये होतो. सर्व नेते बसले होते, सर्व निशब्द होते, काय बोलणार? एवढ्या मोठ्या माणसाचं आमच्यासारखा माणूस काय सांत्वन करणार? काहीच करू शकत नाही. हा फार मोठा धक्का होता. त्यामुळे त्यांच्यासोबत राहणे, त्यांना एकटेपणा जाणवू नये, एवढीच भूमिका दोन दिवस राहिली. हळूहळू साहेब जेव्हा यातून बाहेर येतील तेव्हा बोलणं होऊ शकते. माझा तर विषय कुटुंबापुरता मर्यादित राहणार आहे. राजकारणाबाबत मी त्यांच्याशी चर्चा करत नाही, कारण तो माझा विषयच नाही.
VIDEO: विठ्ठल मणियार यांच्याशी NDTV मराठीने केलेली खास बातचित