Ajit Pawar Irrigation Scam Allegation 2026 : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सिंचन प्रकल्पांच्या फाईल्सवरून त्यांनी थेट भाजपाच्या कारभारावर बोट ठेवले. एका प्रकल्पात चक्क 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी वाढवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि मित्रपक्ष दोघांमध्येही अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय केला आरोप?
अजित पवार यांनी भाषणादरम्यान जलसिंचन विभागातील एका जुन्या फाईलचा संदर्भ दिला. पुरंदर उपसा योजनेचे उदाहरण देताना ते म्हणाले की, सुरुवातीला या योजनेचा खर्च 330 कोटी रुपये होता. मात्र, जेव्हा ही फाईल बारकाईने तपासली गेली, तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आल्याचे समोर आले.
यातील तब्बल 100 कोटी रुपये हे पार्टी फंडासाठी वाढवण्यात आले होते, तर 10 कोटी रुपये अधिकाऱ्यांनी वाढवले होते. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, ही फाईल अजूनही त्यांच्याकडे सुरक्षित आहे आणि जर त्यावेळी त्यावर कारवाई झाली असती, तर संपूर्ण राज्यात हाहाकार माजला असता.
( नक्की वाचा : PMC Election : 'घड्याळाचा अलार्म लावा पण ते घरीच ठेवा!' फडणवीसांची टोलेबाजी, पुण्यातील नियोजनाचे काढले वाभाडे )
मुख्यमंत्र्यांना उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सभेत बोलताना अजित पवारांवर नाव न घेता टीका केली होती. अजित पवारांनी त्यालाही उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले होते की 'खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा', यावर पलटवार करताना अजित पवार म्हणाले की, माझ्याकडे अर्थ खाते होते तेव्हा तिजोरीत काय परिस्थिती होती हे मला ठाऊक आहे.
आम्ही तिजोरीत पैसे आणू आणि दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, लोकांच्या हक्काचे पैसे उधळले जात नसून ते नागरिकांच्या फायद्यासाठीच वापरले जात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पुण्यात अजित पवार मॅजिक फिगर गाठणार
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा दावा त्यांनी केला. निवडणुकांनंतर कोणाच्याही पाठिंब्याची गरज पडणार नाही आणि राष्ट्रवादी स्वतःच्या बळावर मॅजिक फिगर गाठेल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.आता संकटाचा अलार्म बंद करा आणि ईव्हीएमवर घड्याळाचे बटण दाबून राष्ट्रवादीला विजयी करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ?
राजकीय युती आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. सध्यातरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची कोणतीही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. मात्र, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे काही ठिकाणी एकत्रित निवडणुका लढवल्या जात असल्याचे त्यांनी मान्य केले.