वरळीतील बहुचर्चित बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी अजित पवारांनी बीडीडी वासियांचे अभिनंदन करत मुंबईतील रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दलही मोठे आश्वासन दिले.
'धारावीचे स्वप्न महायुती सरकार पूर्ण करणार'
शासनाच्या धोरणामुळे अनेक रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि मुंबई झोपडपट्टी मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला. ठाकरे गटाचे नेते, माजी सहकारी आमदार सचिन अहिर यांचे नाव घेत अजित पवारांनी म्हटलं की, सचिन अहिर आता तू कुठेही असो, आपण एकत्र काम केलं आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांचे जसे घराचे स्वप्न पूर्ण झाले, त्याचप्रमाणे मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, काही वर्षांत धारावीचे देखील स्वप्न पूर्ण होणार. कुणी काहीही म्हणो, महायुतीचे सरकार हे करूनच दाखवणारच आहे."
(नक्की वाचा- Ganeshotsav 2025: मुंबईकरांनो, कोकणात गणपतीला ST नेच जा! 30% भाडेवाढीचा 'तो' निर्णय रद्द)
या वक्तव्यातून त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामात येणाऱ्या संभाव्य अडचणींवर आणि विरोधकांच्या टीकेवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. धारावी पुनर्विकासाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते आणि यावरून नेहमीच राजकीय वाद होत असतो. मात्र, महायुती सरकारने हे काम हातात घेतले असून, ते पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
(नक्की वाचा- NDTVच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग! मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात)
बीडीडी वासियांच्या डोळ्यात आनंदाश्रू
बीडीडी चाळीतील रहिवाशांचे अभिनंदन करताना अजित पवार म्हणाले की, "घराच्या चाव्या देण्याच्या कार्यक्रमात अनेक जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज त्यांचा घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. बीडीडीच्या पुनर्विकास प्रकल्पातील बांधकाम अत्यंत दर्जेदार आहे. यात एकही चूक काढण्यासाठी जागा नाही. महायुती सरकारने हे काम हातात घेतले आणि ते आज पूर्णत्वाला जात आहे. १६० चौरस फुटांच्या घरात राहणारे लोक आता ५०० चौरस फुटांच्या घरात राहणार असल्याने हा त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक दिवस असल्याचेही त्यांनी नमूद केले.