
Ganeshotsav 2025: मुंबईतील गणेशभक्तांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
का केली होती भाडेवाढ?
मुंबई व उपनगरातील चाकरमानी- प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल 5 हजार जादा एसटी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटीने केली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये शासनाने दिलेल्या अमृतज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतात. तथापि, प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते. हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो.
हा तोटा काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर 30 टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता. परंतु मुंबईकरांच्या तीव्र भावना तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनंतर एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ रद्द करण्यात येत असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली.
( नक्की वाचा : ST Bus : पुढील 2 वर्षात ‘एसटी'चा चेहरामोहरा बदलणार, परिवहन मंत्र्यांनी सांगितला प्लॅन )
उत्सव काळात एसटीचे भाडे खाजगी बसेसच्या तुलनेत अत्यल्प
गणेशोत्सव, मुंबईकर आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. कोकणी माणसाचे एसटीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. त्यामुळे तोटा सहन करून देखील एसटी गणपती उत्सव, दिवाळी, होळी या सारख्या उत्सव काळात चाकरमान्यांना नेहमीच प्रवासी सेवा देत आली आहे. यापुढेही देत राहील! परंतु, चाकरमानी - प्रवाशांनी देखील एसटीच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा! कारण सध्या उत्सव काळामध्ये खाजगी बसेस भरमसाट भाडेवाढ करतात. त्यांच्या वाढत्या तिकीट दराच्या तुलनेमध्ये एसटीचे तिकीट दर हे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे भविष्यात एसटीने तत्कालीन दरवाढ केल्यास प्रवाशांनी त्याला सहकार्य करावे! असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.
16 कोटींच्या तोट्याचा अंदाज
मागील वर्षी एसटी महामंडळाने गणपती उत्सवासाठी जाताना 4330 बसेस, आणि परतीच्या प्रवासासाठी 1104 बसेस उपलब्ध करून दिलेल्या होत्या. पण , एकेरी गटारक्षणामुळे गणपती उत्सवाच्या काळामध्ये प्रवाशांना कोकणात त्यांच्या इच्छित स्थळी पोचवून रिकाम्या बसेस परत आणाव्या लागल्या, तसेच त्यांना परतीच्या प्रवासासाठी देखील बसेस उपलब्ध करून देताना रिकाम्या बसेस राज्याच्या विविध भागातून कोकणात पाठवाव्या लागल्या.
( नक्की वाचा : Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले )
त्यामुळे इंधन खर्च, चालक वाहकांचे वेतन, अतिकालीन भत्ता याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा एसटीवर पडला. यातून गणपती उत्सवाच्या काळामध्ये मिळालेल्या उत्पन्नामध्ये तब्बल 11 कोटी 68 लाख रुपये तोटा महामंडळाला सहन करावा लागला. यंदा 5 हजार बसेस सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या सर्व बसेस एकेरी गट आरक्षणासाठी आरक्षित झाल्यास हा तोटा 13 ते 16 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world