सूरज कसबे, पिंपरी चिंचवड
Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळवडे येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. आपल्या 25 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा दाखला देत त्यांनी शहरात सुरू असलेल्या दहशतीच्या राजकारणाचा समाचार घेतला.
"मी कधीही फोडाफोडी केली नाही"
सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, "माझ्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. मात्र, सध्या शहरात लोकांना दम देऊन, दबाव टाकून स्वतःकडे वळवण्याचे प्रकार सुरू आहेत. पिंपरी-चिंचवडकरांनी अशी गुंडगिरी आणि दबावतंत्र असले धंदे अजिबात खपवून घेऊ नये."
श्रीमंत महापालिका झाली कर्जबाजारी!
पवारांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवत भाजपला धारेवर धरले. 1992 ते 2017 या काळात राष्ट्रवादीच्या सत्तेत महापालिकेवर कधीही कर्ज काढण्याची वेळ आली नाही. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेली महापालिका आज भ्रष्टाचारामुळे कर्जबाजारी झाली आहे. आमच्या काळात कधीही पाच पैशांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असा दावा त्यांनी केला. शहरात पोलिसांचा दरारा संपला असून उघडपणे धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
भविष्यातील राजकीय समीकरणे
यावेळी अजित पवारांनी एक महत्त्वाचे विधान केले. " 2029 पर्यंत या शहरातून पाच आमदार निवडून येतील आणि विधानसभेत 96 महिला आमदार असतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.