Akola News: लोकांच्या जिवाशी खेळ! हातगाड्यांवरील नाश्ता खाताय? अकोल्यातील हा VIRAL VIDEO पाहून ओकारी येईल

Akola News: अकोला मुख्य बसस्थानक परिसरात नाश्त्यासाठी नाल्यातील पाणी वापरल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर महापालिकेने तातडीने कारवाई करत परिसरातील हातगाड्या हटवल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Akola News: अकोल्यातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल"
NDTV Marathi

- योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News: स्वच्छता आणि आरोग्याच्या गप्पा मारल्या जात असताना अकोला शहरातील अतिशय संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात नाश्त्याच्या गाडीवर चक्क नाल्यातील पाणी वापरले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे अकोलेकरांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ मांडला जात असल्याचे समोर आले आहे. यावर प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

नाश्त्यासाठी वापरलं जातंय नाल्याचे पाणी

अकोल्याचे मुख्य बसस्थानक हे प्रवाशांची मोठी वर्दळ असलेले ठिकाण आहे. या परिसरात अनेक हातगाड्यांवर नाश्ता आणि खाद्यपदार्थ विकले जातात. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही व्यक्ती नाश्त्याच्या गाडीसाठी चक्क शेजारील उघड्या नाल्यातून डब्यात पाणी भरून नेताना स्पष्ट दिसत आहेत. हेच पाणी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीसह तीव्र संतापाची लाट उसळली.

Advertisement

आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

नाल्याच्या पाण्याचा वापर करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांमुळे अकोल्यातली स्थानिक तसेच पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  

(नक्की वाचा: Thane News: ठाणे हादरलं! नौपाड्यात 7 वर्षांच्या मुलीवर 45 वर्षीय बांधकाम मजुराचा बलात्कार, कशी उघडकीस आला घटना?)

महापालिकेची धडक कारवाई

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोला महानगरपालिका प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरक्षा पथकाच्या मदतीने बसस्थानक चौक परिसरात धडक मोहीम राबवली. ज्या हातगाड्यांवर अशा प्रकारे अस्वच्छता आणि नियमबाह्य कृत्ये सुरू होती, त्या सर्व गाड्या आणि रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

या कारवाईमुळे अनधिकृत खाद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले असले, तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी देखरेख ठेवण्याची मागणी अकोलेकरांकडून होत आहे.

Drain water for Breakfast |अकोल्यात नाश्ता बनवण्यासाठी चक्क नालीच्या पाण्याचं वापर, व्हिडीओ आला समोर