Akola News : 2 वर्षांपासून सतत वाद, त्या दिवशी उडाला भडका; अकोल्यात भरदिवसा पत्नीसोबत क्रूरतेचा अंत, पतीला अटक

अकोल्यातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जैन तेल केंद्र परिसरात घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola News : अकोल्यातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जैन तेल केंद्र परिसरात घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगला गुडदे, वय 40 वर्षे, असे मृत महिलेचे नाव असून त्या रेणुका नगर परिसरात भाड्याने राहत होत्या. आज सकाळी पती दीपक गुडदे आणि मंगला यांच्यात पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून वाद झाला. गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये सतत घरगुती वाद सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. सकाळच्या वेळेत परिसरात अचानक गोंधळ उडाल्याने नागरिक घटनास्थळी धावले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दुधाची पिशवी आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला..

माहितीनुसार, मंगला गुडदे या सकाळी जवळच्या दुकानातून दुधाची पिशवी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पती दीपक गुडदे याच्यासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. या वादानंतर संतापाच्या भरात दीपक याने धारदार चाकूने पत्नीवर एकापाठोपाठ एक वार केले. पोटावर आणि पाठीत गंभीर वार झाल्याने मंगला गुडदे या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश पसरला. विशेष म्हणजे मृत महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी असून लवकरच मुलीचा विवाह करण्याचा कुटुंबाचा बेत होता. मात्र काळाने घाला घालत संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत.

Advertisement

आरोपी ताब्यात; पोलीस तपास सुरू...

घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ डाबकी रोड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. आरोपी पती दीपक गुडदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक कोळी यांनी माध्यमांना घटनेची माहिती दिली. प्राथमिक तपासात ही हत्या घरगुती वादातून झाल्याचे समोर येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अकोल्यातील या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Topics mentioned in this article