बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याच्या वडिलांनी उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी माझ्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला आहे. 25 सप्टेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. (Badlapur News)
या याचिकेत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी सांगितलं की, या प्रकरणातील सहा आरोपी अद्यापही फरार आहेत आणि तेदेखील तितकेच जबाबदार आहेत. माझ्या मुलावर खोटे आरोप लावण्यात आले आणि तो राजकारणाचा बळी ठरला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी या एन्काउंटरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकील अमित कटारनवरे यांनी अक्षयच्या वडिलांचं वकीलपत्र घेतलं आहे. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप अक्षयच्या वकिलांकडून केला जात आहे. नजीकच्या काळात निवडणुका असल्याने हे सत्ताधाऱ्यांचा आदेशामुळे खून केल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, अशा पद्धतीच्या घटनांमुळे आपण पोलिसांना या प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी पाठिंबा देतो, असा त्याचा अर्थ निघतो. मग कायदा आणि सुव्यवस्था कशासाठी आहे. देवाचा न्याय अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांना प्रोत्साहन दिलं जात आहे. जे न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे.
नक्की वाचा - 'ती'ची एन्ट्री अन् मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी शेवट; ठाणे पोलिसांनी सांगितलं त्या तक्रारीनंतर फिरलं चक्र
न्यायमूर्ती - गोळी कुठे लागली?
सरकारी वकील - त्याच्या डोक्यात
न्यायमूर्ती - पिस्तुल होती की रिव्हॉल्व्हर?
सरकारी वकील - पिस्तुल होती.
न्यायमूर्तीनी न्यायालयात उपस्थित केले सवाल..
1. पिस्तुल कशी वापरतात हे तुम्हाला माहिती आहे का? पिस्तुल वापरणं सोपं नाही. तुम्ही कधी वापरली आहे का? तुम्ही जे सांगताय ते खरं नाही. मी 100 वेळा पिस्तुल वापरली आहे. सामान्य माणूस त्याच्या ताकदीशिवाय पिस्तुल वापरू शकत नाही. आरोपी तुमच्याकडून पिस्तुल कशी घेऊ शकतो? तुम्ही इतके निष्काळजी कसे असू शकता? इतक्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपीबाबत दुर्लक्ष झालंय. अक्षयने चालवलेली गोळी उलटी येऊन कोणाला लागली कशी नाही? ही गोळी फायर केल्यानंतर वर उडते आणि परत येऊन एखाद्याला लागते.
2. पिस्तुलावर आरोपीच्या हाताच्या खुणा असायला हव्यात. याबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीत सादर करा. आरोपीनं तीन बुलेट झाडल्या असं सांगताय. तर एक पोलिसाला लागली तर दुसऱ्या दोन बुलेट कुठे आहेत? पोलिसांनी गोळी झाडताना आरोपीच्या पायावर किंवा हातावर का झाडली नाही?
3. चार पोलीस अधिकारी असताना आरोपी आक्रमक कसा होऊ शकतो?
नक्की वाचा - अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांकडून संताप, पण कारण काय? 7 मुद्द्यांमधून समजून घेऊया
4. ज्या पोलीस अधिकाऱ्यानं गोळी मारली, त्यानं कमरेच्या खाली गोळी मारायला हवी होती. ते कितीच्या बँचचे पोलीस अधिकारी आहेत. १९९२ च्या बँचचे पोलीस अधिकारी आहेत का?
5. हा एन्काऊंटर म्हणता येणार नाही. हे एन्काऊंटर नाहीच.
6. आणखी एक पैलू आहे. आरोपीला लांबून किंवा पॉइंट ब्लँक रेंजवरून गोळी घातली गेली. याचा फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवा. तसेच आरोपीला गोळी झाडल्यानंतर ती गोळी उजव्या बाजूने बाहेर आली, त्यानंतर गोळी कुठे लागली? या घटनेमध्ये पोलिसांचा सहभाग असेल तरी निःपक्षपाती तपास हवा.
7. आम्हाला कोणत्याही गोष्टीवर संशय नाही, आम्हाला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे.
8. गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीला तुम्ही घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का झाला? SOP म्हणजे काय? त्याला बेड्या घातल्या होत्या का? (पाणी मागितल्यावर बेड्या काढण्यात आल्याचं सरकारी अधिवक्त्यांनी सांगितलं)
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
9. तुम्ही पिस्तुलावरील बोटांचे ठसे घेतले का? तुम्ही म्हणालात की, आरोपींनी पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या. फक्त एकालाच कसा फटका बसला? सामान्यतः आपण स्वसंरक्षणासाठी पायावर गोळी झाडतो. कोणीही सहसा स्वसंरक्षणासाठी कुठे गोळीबार करतो? हात किंवा पाय असू शकतो.
10. चार अधिकारी आणि अक्षय असे पाच जणं वाहनात होते. वाहनात चार अधिकारी असताना ते एका माणसावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, यावर विश्वास कसा ठेवायचा? (सरकारी वकील - ही तात्काळ प्रतिक्रिया होती.) ते टाळता आले नसते का? पोलीस प्रशिक्षित आहेत, सामान्य माणसालाही माहीत आहे की, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी कुठे गोळीबार करावा.
फेक एन्काऊंटर..
अण्णा शिंदे यांनी वकील अमित कटरनवरे यांच्या द्वारे दाखल केलेल्या याचिकेत राज्य सरकारवर धक्कादायक आरोप केले आहेत. अक्षयची हत्या फेक एन्काउंटरमध्ये करण्यात आल्याचा आरोप अण्णा शिंदे यांनी केला आहे.