जाहिरात

फुलांचा हार अन् पिशवीच्या आडून लाखोंची चोरी; माऊलींच्या दानपेटी चोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

एका साध्या सेवेकऱ्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम आल्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहाराची व्याप्ती केवळ काही लाखांपुरती मर्यादित नसून खूप मोठी असल्याचा संशय बळावला आहे.

फुलांचा हार अन् पिशवीच्या आडून लाखोंची चोरी; माऊलींच्या दानपेटी चोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

सूरज कसबे, प्रतिनिधी

Alandi Temple Theft : देवाच्या आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या पवित्र आणि अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील दानपेटीतून भाविकांचे दान लंपास करणाऱ्या एका सेवेकऱ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशाल वारुळे नावाच्या या सेवेकऱ्याने माऊलींच्या दानपेटीवर डल्ला मारला असून, पोलिसांनी त्याच्या घरातून तब्बल पावणे चार लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात आणि भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या संशयित आरोपीच्या बँक खात्यात तब्बल १० लाख रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आल्याने या चोरीची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फुलांच्या हाराच्या आड पैशांची चोरी... अशी होती मोडस ऑपरेंडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून विशाल वारुळे हा मंदिरात दानपेटीतील रक्कम जमा करणे आणि ती मोजून ठेवण्याचे काम करत होता. याच कामाचा फायदा घेत तो पैशांवर हातचलाखी करायचा. दानपेटीतील रक्कम गोळा करताना तो १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा चोरून एका पिशवीत भरायचा. ही चोरी कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तो एक युक्ती वापरायचा. ज्या दिवशी त्याला पैशांची पिशवी घरी घेऊन जायची असे, त्या दिवशी तो मंदिरातून देवाचे काही हार सोबत घ्यायचा. मी मंदिरातील हार घरी घेऊन चाललो आहे, असे सांगून तो ती पिशवी अशा प्रकारे पकडायचा की वर फक्त हार दिसतील. मात्र, त्या हारांच्या खाली चोरी केलेली रोकड लपवलेली असायची. घरी पोहोचल्यावर तो ही रोकड मोजायचा आणि पिशवी आहे तशी बेडमध्ये लपवून ठेवायचा. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता, बेडमध्ये लपवलेल्या पिशव्यांमधून तब्बल पावणे चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मात्र त्यातील 15 हजार रुपये केवळ मंदिरातील आणि 3.50 लाखांपेक्षाची अधिकची रक्कम ही स्वतःहाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता याबाबतचा तपास सुरू आहे.

नक्की वाचा - Akola News : ना शाल-श्रीफळ, ना महागड्या भेटवस्तूंचा पाऊस; अकोल्यातली अनोख्या विवाहसोहळ्याची राज्यभरात चर्चा

बँक खात्यात १० लाखांची उलाढाल, वरदहस्ताचा संशय

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा धागा लागला आहे. संशयित आरोपी विशाल वारुळे याच्या बँक खात्याची तपासणी केली असता, त्यात तब्बल १० लाख रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचं उघडकीस आलं आहे. एका साध्या सेवेकऱ्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम आल्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहाराची व्याप्ती केवळ काही लाखांपुरती मर्यादित नसून खूप मोठी असल्याचा संशय बळावला आहे. असा आरोपी आळंदीतील ग्रामस्थ डी. डी. भोसले यांनी केला आहे.

वारकरी महामंडळ आक्रमक, सखोल तपासाची मागणी

या गंभीर प्रकारानंतर राज्य वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष डी. डी. भोसले कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. चोरी करणाऱ्या या सेवेकऱ्याच्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी मोठा वरदहस्त असल्याशिवाय तो एवढे धाडस करू शकत नाही, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. पुढे बोलताना भोसले यांनी सवाल उपस्थित केला की, अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुख्य मंदिरात आणि गाभाऱ्याजवळ या सेवेकऱ्याला प्रवेश कोणी दिला? तसेच दानपेटी मोजण्याच्या प्रक्रियेत त्याला मंदिरातील किंवा बाहेरील इतर कोणी सहकार्य केले आहे का? या सर्व बाबींचा पोलिसांनी सखोल आणि सविस्तर तपास करावा, अशी आग्रही मागणी वारकरी महामंडळाने केली आहे. पवित्र तीर्थक्षेत्री घडलेल्या या लज्जास्पद प्रकारामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून, आरोपीवर आणि त्याला मदत करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com