अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News Today : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळ असलेल्या शेवाळवाडी-गणेशवाडी येथे अंतर्गत रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला असून संपूर्ण गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. आमदार निधीतून सुरू असलेल्या रस्त्याच्या विकासकामाला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर परिस्थिती चिघळली असून गावाभोवतीचे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी-गणेशवाडी परिसरातील अनेक रस्ते हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत. या जुन्या रस्त्यांचा विकास करून गावातील दळणवळण व्यवस्था सुधारण्याचा निर्णय प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतला होता. यासाठी आमदार निधीतून मोठ्या प्रमाणात निधीही मंजूर करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी “रस्ता माझ्या जागेतून का?” असा प्रश्न उपस्थित करत कामाला विरोध सुरू केला.
नक्की वाचा > Ratnagiri News: चिपळूणमध्ये HDFC बँकेचा कर्मचारी बेपत्ता,चार पानी पत्र लिहून ऑफिसमध्ये उडवली खळबळ
वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचे?
या विरोधामुळे हळूहळू संपूर्ण गावातच दोन गट निर्माण झाले आणि वाद अधिक तीव्र झाला. अखेर संतप्त ग्रामस्थांनी गावाभोवतीचे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांना बाहेर जाणे आणि गावात येणे कठीण झाले आहे. विशेषतः एखादी तातडीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचे, असा गंभीर प्रश्न आता ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान, या प्रकरणात आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदारांनी यापूर्वी पोलिस बंदोबस्तात रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
मात्र वाढता विरोध आणि तणावपूर्ण परिस्थिती पाहता प्रशासनाने सध्या माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रशासनाने वेळेत ठोस भूमिका घेतली नाही आणि त्यामुळेच परिस्थिती आणखी बिघडली.गावातील सजग नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा, अशी मागणी केली आहे. ग्रामीण भागात अनेकदा रस्ते, पाणंद मार्ग किंवा जागेच्या सीमांवरून वाद निर्माण होत असतात. मात्र काही व्यक्तींच्या विरोधामुळे संपूर्ण गावाच्या विकासाला खीळ बसत असल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
नक्की वाचा >> Pune News: सिंहगड किल्ल्यावरून खाली येताना दोन पर्यटकांसोबत भयंकर घडलं, चार पथक घटनास्थळी पोहोचले अन्..
"तोपर्यंत रस्ते बंदच ठेवणार”
सरकारने मागील काही वर्षांत पाणंद रस्ते आणि ग्रामीण रस्ते विकासासाठी विविध योजना आणल्या असल्या तरी गावपातळीवर सामंजस्याची भूमिका घेतली गेली नाही तर अशा प्रकारचे संघर्ष निर्माण होतात, याचे हे ताजे उदाहरण मानले जात आहे. सध्या तरी ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, “जोपर्यंत वरिष्ठ प्रशासनातील अधिकारी गावात येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत रस्ते बंदच ठेवणार,” असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि हा वाद कुठपर्यंत पोहोचतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world