जाहिरात

Ambernath News: माईक विरुद्ध मेगाफोन! अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना-भाजप आमनेसामने; खडाजंगीचे कारण काय?

Ambernath News: शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात चक्क मेगाफोन आणून आपला आवाज उठवल्याने या सभेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Ambernath News: माईक विरुद्ध मेगाफोन! अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना-भाजप आमनेसामने; खडाजंगीचे कारण काय?
अंबरनाथ:

Ambernath News: अंबरनाथ नगरपालिकेच्या विशेष सभेत आज (मंगळवार, 28 एप्रिल) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. माईक बंद असल्याच्या कारणावरून पेटलेला वाद थेट मेगाफोनपर्यंत पोहोचला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात चक्क मेगाफोन आणून आपला आवाज उठवल्याने या सभेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कचरा समस्या आणि पुनर्वसन यांसारख्या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेली ही सभा अखेर गदारोळातच संपली.

 मेगाफोनचा वापर का?

नगरपालिकेत आयोजित केलेल्या या विशेष सभेत शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन आणि शहरातील कचऱ्याचा प्रश्न यावर चर्चा होणार होती. मात्र, चर्चा सुरू होताच शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी त्यांचे माईक बंद असल्याचा आरोप केला. 

आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा संताप व्यक्त करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोबत आणलेला मेगाफोन काढला आणि त्यावरूनच भाषणं सुरू केली. या प्रकारामुळे सभागृहातील वातावरण चांगलंच तापलं. नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे सांगून दुरुस्तीचे आश्वासन दिले, पण तोपर्यंत वाद विकोपाला गेला होता.

( नक्की वाचा : Kalyan News:पोलिसांच्या श्वानाने 'असा' शोधला खुनी मित्र! कल्याणजवळ नदीकाठी झालेल्या हत्येचा थरारक उलगडा )
 

वादाचे कारण काय?

सभेत राजेंद्र वाळेकर यांनी भाजपच्या नगरसेविका मीनू सिंग यांचे पती बबलू सिंग यांच्यावरील जुन्या एमआरटीपी गुन्ह्याचा उल्लेख केला. हा विषय सभेच्या इतिवृत्तात (मिनिट्स) नोंदवण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, हा विषय अजेंड्यावर नसल्याचे सांगत नगराध्यक्षांनी त्यास नकार दिला. यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अखेर मतदानाच्या जोरावर ही सभा तहकूब करण्यात आली.

कचऱ्याचा प्रश्न राहिला बाजूलाच

शहरातील कचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर या सभेत उपाययोजना अपेक्षित होत्या. मात्र, राजकीय आरोप-प्रत्यारोपांत हा महत्त्वाचा विषय मागे पडला. सभा तहकूब झाल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. शिवसेनेने मुद्दाम कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा टाळल्याचा आरोप भाजप गटनेते अभिजित करंजुले यांनी केला. "जनतेने आपल्याला प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी निवडून दिले आहे की राजकारण करण्यासाठी?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

( नक्की वाचा : Kolhapur News:नाशिक, अमरावतीनंतर आता कोल्हापूर! प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओचं रॅकेट उघड )

राज्यातील सत्तासंघर्ष आणि नगरसेवकांच्या अपात्रतेच्या याचिकांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या मोठा तणाव आहे. याच तणावाचे पडसाद अंबरनाथच्या स्थानिक राजकारणात आणि आजच्या सभेत स्पष्टपणे उमटताना दिसले. एकीकडे माईक बंदचा आरोप आणि दुसरीकडे सभेच्या इतिवृत्तावरून झालेला वाद यामुळे अंबरनाथ पालिकेतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com