रामराजे शिंदे, नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरु आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या देखील जागावाटपाबाबत बैठका सुरु आहे. जागावाटपाचा तोडगा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जागावाटपाबाबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेदरम्यान अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून महत्त्वाचे विधान केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. "शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदार अशी काही महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहेत. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला", असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
अमित शाह यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जागावाटपात तडजोड करावी लागणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार का? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
महायुतीमध्ये 90 टक्के जागांवर एकमत
NDTV ला खास सूत्रांनी जागावाटपाची इनसाईड इन्फॉर्मेशन दिली आहे. महायुतीमध्ये 90 टक्के जागांवर एकमत झाल्याचे सांगण्यात आले आहे. उरलेल्या 10 टक्के जागांचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा नसेल असे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे.
कसा असेल जागावाटपाचा फॉर्म्युला?
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 158 जागा लढणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. भाजपखालोखाल सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता असून शिवसेनेला 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 50 जागा मिळण्याची शक्यता आहे.