जाहिरात

राष्ट्रवादी पुन्हा एकसंघ होऊ शकते का? अमोल कोल्हे म्हणाले...

Amol Kolhe : महाविकास आघाडीने इतर पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या. अजित पवारांच्या पक्षाचे तर काही जिल्ह्यांमध्ये अस्तित्वच राहिले नाही, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी पुन्हा एकसंघ होऊ शकते का?  अमोल कोल्हे म्हणाले...

अविनाश पवार, शिरुर

महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सध्या राज्यभर दौरा सुरू आहे. लवकरच महाविकास आघाडीचा जाहीरनामा आपल्यासमोर येणार आहे, अशी माहिती त्यांनी एनडीटीव्हीशी बातचीत करताना दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पुन्हा एकसंघ होऊ शकते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. बारातमीत अजित पवार यांच्या भावनिक भाषणांनंतर या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर भाष्य केलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होऊ शकते का? प्रश्न तुम्ही 2 जुलैला का विचारला नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2 जुलै 2023 ला ज्यांनी ही भूमिका घेतली त्या प्रत्येकाला जाऊन विचारा की राष्ट्रवादी एकसंघ ठेवू शकत नव्हते का? केवळ विकासाची भूमिका घेऊन 40 आमदार बाहेर पडले. मग आता त्यांनी सांगावं की दुधाला भाव मिळतोय का? शेतीच्या मालाला भाव मिळतोय का? अशा अनेक प्रश्नांवर खऱ्या अर्थाने काही उत्तर मिळाले आहे का? केवळ रस्त्यांना आणि इमारतींना निधी देणे म्हणजे विकास  आहे का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. 

(नक्की वाचा - राष्ट्रवादी पक्षफुटीवर शरद पवार पहिल्यांदा एवढं बोलले, बारामतीत मोठं भाष्य)

आम्ही महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष येत्या काळात यासंदर्भात महागाईवर आणि इतर सर्व बाबींवर विचार करूनच जाहीरनामा काढत आहोत. आतापर्यंत इतक्या लोकांचे रोजगार गेले याबद्दल श्वेतपत्रिका काढली नाही. मागील काळात साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक राज्याबाहेर गेली, अशी टीका अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर केली. 

(नक्की वाचा-  आर आर पाटलांनी केसाने गळा कापला; अजित पवार असं का म्हणाले?)

महायुतीच्या कारभाराला सर्व जनता कंटाळली आहे. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजराती चाकरी करणे, हे आता या जनतेला मान्य नाही. त्यामुळे येत्या काळात हे सरकार बदलणार आहे, असा दावाही अमोल कोल्हे यांनी केला.  महायुतीने इतर दोन पक्षांचा अक्षरशः कडीपत्ता करून टाकला आहे. त्याउलट महाविकास आघाडीने इतर पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या. अजित पवारांच्या पक्षाचे तर काही जिल्ह्यांमध्ये अस्तित्वच राहिले नाही, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com