Amravati News : 'दिल्लीच्या आंदोलनात असामाजिक तत्व घुसले, मात्र पंतप्रधानांनी...'; भाजप खासदाराचे गंभीर आरोप

अमरावती येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'सेवा समर्पण दशक' कार्यक्रमात ते बोलत होते.

जाहिरात
Read Time: 3 mins

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati News : 'नीट परीक्षा आंदोलनाच्या नावाखाली दिल्लीत झालेल्या निदर्शनांमध्ये असामाजिक तत्वांनी घुसखोरी करून हिंसा भडकावण्याचा प्रयत्न केला. देशाला बरबाद करण्यासाठी भारत आणि भारताबाहेर एक मोठी टीम सक्रिय असून बांगलादेश अन् नेपाळसारखी अराजकता भारतात घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र उधळवून लावले,' असा थेट गंभीर आरोप भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

अमरावती येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'सेवा समर्पण दशक' कार्यक्रमात ते बोलत होते.

‘नीट' संदर्भात पंतप्रधान मोदींनी घेतला कठोर निर्णय

भाषणादरम्यान नीट परीक्षेच्या मुद्द्यावर बोलताना डॉ. बोंडे म्हणाले, "काँग्रेसचे सरकार असते तर नीट पेपर फुटीचे प्रकरण दाबून टाकले गेले असते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कडक कायदा करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली. २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन एका महिन्याच्या आत विमानाने सुरक्षित पेपर आणून पुन्हा परीक्षा घेण्यात आली. आंदोलनादरम्यान काही जणांनी पंतप्रधानांवर राग व्यक्त केला, अभद्र शब्द वापरले; मात्र मोदींनी 'सर्व मुले माझीच आहेत' असे म्हणत सर्वांना माफ केले."

Advertisement

डॉ. बोंडे पुढे म्हणाले, "२०१४ पासून २०२६ पर्यंत भारताला जगातील महासत्ता बनवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 'एकात्म मानवतावादाच्या' विचारांवर देश आणि राज्य सरकार चालत आहे. कलम ३७० रद्द झाल्यामुळे आज काश्मीरमध्ये तिरंगा फडकतोय. तर दुसरीकडे, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी एका क्षणात शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात भाजप हाच सर्वात शक्तिशाली पक्ष आहे."

नक्की वाचा - MBA, LLB आणि Btech Gen Z तरुणांवर रस्ता स्वच्छतेची जबाबदारी, नागपुरातील 'या' पत्राची मोठी चर्चा


'जेन झी' आणि 'जेन अल्फा'वर भाजपचा भर; मोर्चा वळवला

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता तरुणांकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. "विकसित भारत आणि समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी 'जेन झी' आणि 'जेन अल्फा' या नव्या पिढीला एकत्र आणावे लागेल. यावर्षीचे संपूर्ण वर्ष तरुणाईला समर्पित केले जाईल," अशी मोठी घोषणा डॉ. बोंडे यांनी केली. या कार्यक्रमात नीट परीक्षेसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या 'जेन झी' गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या भव्य सोहळ्याला भाजप आमदार प्रवीण पोटे, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रताप अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी आमदार रमेश बुंदिले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, तुषार भारतीय, निवेदिता चौधरी, चेतन गावंडे, किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी, नितीन गुडधे, शिक्षक नेत्या संगीता शिंदे, नितीन धांडे, डॉ. वसुधा बोंडे, माजी सभापती विक्रम ठाकरे, अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली माथने, शेंदूरजना घाटच्या नगराध्यक्ष सुवर्णा वरखेडे, वरुडचे ईश्वर सलामे, नगरसेविका डॉ. मधुरा काहाळे, डॉ. विलास कविटकर, चेतन पवार, बाळासाहेब हिंगणीकर प्रियंका मालठाने, अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सलीम घानीवाले,  नकुल सोनटक्के, यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.