शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News : शहरातील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रहाटगाव नजीक नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. कोणतेही अधिकृत उद्घाटन झाले नसतानाच, यावरून थेट वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या गंभीर निष्काळजीपणावर शिवसेनेचे युवा पदाधिकारी संकेत पाटील डालके यांनी तीव्र संताप व्यक्त करत महामार्ग प्राधिकरणाला थेट जाब विचारला आहे.
अपूर्ण उड्डाणपुलावरुन वाहतूक का सुरू केली?
महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या रहाटगाव चौकातील उड्डाणपुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पुलावर अनेक ठिकाणी अद्यापही कामे बाकी आहेत. असे असतानाही कोणत्या आधारावर आणि कोणाच्या परवानगीने हा अपूर्ण पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. उद्घाटनापूर्वीच अशा प्रकारे धोकादायक पुलावरून वाहनांची बेधडक वर्दळ सुरू झाल्याने येथे मोठ्या अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
या संपूर्ण निष्काळजीपणाच्या प्रकारावर शिवसेनेचे युवा पदाधिकारी संकेत पाटील डालके यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. "उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसताना आणि अधिकृत उद्घाटन झाले नसताना घाईघाईत वाहतूक सुरू करणे म्हणजे प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. जर या अपूर्ण पुलावरून वाहतूक सुरू असताना एखादा गंभीर किंवा प्राणघातक अपघात घडला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी महामार्ग प्राधिकरण घेणार का?" असा परखड सवाल संकेत पाटील डालके यांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा - Nagpur News : आता LPG-PNG विसरा; इथेनॉलचा वापर थेट स्वयंपाकघरात
रहाटगाव चौक हा नेहमीच मोठ्या वाहतुकीचा आणि वर्दळीचा भाग राहिला आहे. अपूर्ण उड्डाणपुलामुळे वाहनधारकांचा गोंधळ उडत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने त्वरित या प्रकाराची दखल घेऊन सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पूर्ण कराव्यात आणि अधिकृत कामाच्या पूर्ततेनंतरच पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world