आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या लाखो भाविक आणि वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये 6 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या सर्व हलक्या तसेच जड वाहनांना राज्यातील टोल नाक्यांवर पूर्णपणे टोलमाफी देण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वतीने काल, 6 जुलै रोजी याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या 10 मानाच्या पालख्यांसोबत असणाऱ्या आणि इतर खाजगी वाहनांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
परतीचा प्रवासही मोफत
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वारकऱ्यांच्या गाड्यांना दिलेला हा टोलमाफीचा पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरण्यात येणार आहे. टोल नाक्यांवर वारकऱ्यांची कोंडी होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर स्वतंत्र पोलीस यंत्रणा तैनात केली जाणार आहे. 'हायवे सिक्युरिटी पेट्रोलिंग' मार्फत टोलनाक्यांवर पोलिसांची विशेष व्यवस्था असेल.
(नक्की वाचा- Nashik News: नाशिकवरचे संकट टळले! पालघरमध्ये थैमान घालणारा 'पावसाचा भोवरा' गुजरातकडे सरकला)
दर 20-25 किलोमीटरवर रुग्णवाहिका आणि क्रेन सज्ज
आषाढी वारीदरम्यान राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. हा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत. महामार्गांवर दर 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रुग्णवाहिका आणि क्रेनची व्यवस्था ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Missing Link: प्रवाशांसाठी खूशखबर! पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी पुन्हा खुला)
खड्डे भरण्याचे साहित्य
पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यांवर खड्डे पडल्यास अपघात टाळण्यासाठी तातडीने खड्डे भरण्याचे साहित्यही या केंद्रांवर उपलब्ध असेल. परिवहन विभागाला वारीच्या काळात भाविकांच्या सुविधेसाठी अतिरिक्त बसेस आणि गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.