वारकऱ्यांसाठी चिंताजनक वृत्त! इंद्रायणीला महापूर, नदीवरील 4 पूल पाण्याखाली! प्रशासनाकडून अलर्ट जारी

Alandi Indrayani River Flood: आषाढी वारी 2026 पूर्वी आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर आला असून शहराला जोडणारे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. भाविकांना जेथे आहात तेथेच थांबण्याचे आवाहन प्रशासनाने का केले आहे, सविस्तर वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Alandi Indrayani River Flood: आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी"
NDTV Marathi

Ashadhi Wari 2026: आषाढी वारी 2026 आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. पूरपरिस्थिती गंभीर झाली असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून भाविकांना आळंदी शहरात न येण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

आळंदीचे चारही पूल पाण्याखाली; संपर्क तुटला

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आळंदी शहराला जोडणारे चारही प्रमुख पूल पाण्याखाली गेल्याने सध्यातरी आळंदीत प्रवेश करणे  धोकादायक आणि असुरक्षित झाले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

Advertisement

भाविक जेथे असतील तेथेच थांबण्याचे आवाहन

प्रशासनाने आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलेल्या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी सध्यातरी आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रवासात असणाऱ्या भाविकांनी सुरक्षितता लक्षात घेऊन ज्या ठिकाणी आहात, त्याच ठिकाणी थांबून प्रशासनाला सहकार्य करावे.

(नक्की वाचा: Mumbai Heavy Rain Reason: पुढील काही दिवस धोक्याचे! एवढा पाऊस का पडतोय? मुंबईसह राज्यातल्या धुवांधार पावसाचे 'हे' आहे कारण)

नदीपात्र आणि घाट परिसराकडे जाणे टाळा

आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस यंत्रणेकडून नदीपात्र, घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांच्या परिसरात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आळंदी आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Photo Credit: Government Administration

(नक्की वाचा: Maharashtra Rain: मुंबई-पुणे, नाशिक... पावसामुळे राज्यभरातील कोणकोणते महामार्ग बंद? प्रवासाआधी जाणून घ्या)

प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन:

सूचनांचे पालन करा: प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीचाच आधार घ्यावा.

संयम बाळगा: भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सर्व आवश्यक त्या उपाययोजना करत असून सर्वांनी संयम बाळगून सहकार्य करावे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीच्या दिशेने प्रवास करतात. पण निसर्गाच्या या प्रकोपामुळे वारकऱ्यांनी आधी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

(माहिती : जिल्हा माहिती कार्यालय)