Maharashtra Heavy Rain Road Closed: मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. राज्यभरात सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शहरांमध्ये पाणी साचले आहे. एकीकडे मुंबईत पावसाने लोकलचा खोळंबा झाला असताना राज्यात अनेक मोठे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. अनेक महत्त्वाचे रस्ते बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. नेमके कुठे कुठे रस्ते बंद झालेत? जाणून घ्या...
मुंबई पुणे एक्सप्रेस वे
भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (Expressway) आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर प्रभावित झाली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक थांबवण्यात आली आहे. नागरिकांना विनंती आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास पुढे ढकलावा आणि यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्यतनांचे (updates) पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जुना मुंबई पुणे हायवे
त्याचबरोबर मुंबई पुणे जुना महामार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जुन्या मुंबई महामार्गावर काही ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे (ओव्हरफ्लो झाल्यामुळे) मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. पुढील सुचना येईपर्यंत जुन्या महामार्गावरील वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. वाहतूक बंद झाल्याने वाहन चालकांचे चांगलेच हाल होत आहेत.
पुणे–रायगड राष्ट्रीय महामार्गावरील ताम्हिणी घाट मार्ग मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ताम्हिणी घाटातील डोंगरवाडी प्लस व्हॅली पॉईंटजवळ ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे–माणगाव मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक रविवार (५ जुलै) रात्री ९ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत, डोंगरवाडी प्लस व्हॅली पॉईंटजवळ पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आळंदीत प्रवेश बंद
इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. त्यामुळे आळंदी नदीवरीलही सर्व पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळ वारकऱ्यांनी आहात तिथे थांबावे, आळंदीमध्ये येऊ नसे असं आवाहन करण्यात आले आहे.
पुणे- नाशिक महामार्गही बंद
पुणे-नाशिक महामार्ग गेल्या अनेक तासांपासून ठप्प असून, चाकण परिसरात अद्यापही वाहतूक सुरळीत झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्यामुळे पुणे आणि नाशिक या दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले असले तरी, ओढ्याला आलेला पूर आणि पुलाजवळ साचलेला कचरा यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी पाणी थेट महामार्गावर येत असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे..
कल्याण अहिल्यानगर महामार्गावर जुना रायता पूल वाहतुकीसाठी बंद
कल्याण डोंबिवली टिटवाला या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर जुना रायता पूल उल्हास नदीवर आहे. उल्हास नदीने इशाराची पातळी ओलांडली आहे. जुना रायता ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र काही वाहन चालक बेजबाबदार पणाने आपली वाहन घेऊन जाताना दिसत आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. हा पूल बंद झाल्याने पाच गावांवर याचा परिणाम झाला आहे.
पुणे–नाशिक महामार्गाचा पर्यायी मार्गही बंद; मोई–फलकेवस्ती रस्ता पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे मोई–फलकेवस्ती मार्ग पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुणे–नाशिक महामार्गाला पर्याय म्हणून हजारो वाहनचालक या रस्त्याचा वापर करत होते. मात्र हा मार्गही बंद झाल्याने वाहनचालकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीचा ताण वाढला असून लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पाण्याची पातळी कमी होईपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तळवडे चाकण एम आय डी ला जोडणारा मोई गावचा पूल वाहतुकीसाठी बंद
इंद्रायणी नदीवर असलेला तळवडे तसेच चाकण एम आय डी सी ला जोडला जाणारा मोई गावचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्या नंतर हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्यामुळे पुलाच्या पलीकडे असलेल्या चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे गावाचा संपर्क तुटला आहे ,त्यामुळं गावकऱ्यांना 10 किलोमीटर पर्यंत वळसा घालून गावात यावं लागत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world