जाहिरात

Pune News: आषाढी वारीवर मुक्कामाचे सावट; पुण्याच्या जागेवरून वाद पेटला, काय होणार निर्णय?

Ashadhi Wari 2026 Pune : आषाढी वारीसाठी आळंदीतून प्रस्थान ठेवणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच एक मोठी अडचण समोर आली आहे.

Pune News: आषाढी वारीवर मुक्कामाचे सावट; पुण्याच्या जागेवरून वाद पेटला, काय होणार निर्णय?
Ashadhi Wari 2026 : दरवर्षी माऊलींची पालखी पुण्यात 2 दिवस मुक्कामी असते. (संग्रहित फोटो)
पुणे:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Ashadhi Wari 2026 Pune : आषाढी वारीसाठी आळंदीतून प्रस्थान ठेवणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच एक मोठी अडचण समोर आली आहे. यंदा 8 जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे, परंतु पुण्यातील मुक्कामाच्या जागेवरून सध्या वारकरी संप्रदायात मतभेद निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आणि वाढती गर्दी या दोन्ही गोष्टींचा मेळ घालताना प्रशासकीय आणि धार्मिक पेच निर्माण झाला असून आता सर्वांचे लक्ष 13 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे.

पुण्यातील मुक्कामाचा नेमका वाद काय?

दरवर्षी माऊलींची पालखी पुण्यात 2 दिवस मुक्कामी असते. प्रथेनुसार हा मुक्काम भवानी पेठेतील विठोबा मंदिरात केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत वारीतील भाविकांची संख्या लाखांच्या घरात गेल्याने भवानी पेठेतील जागा अपुरी पडू लागली आहे. अरुंद रस्ते आणि वाढत्या गर्दीमुळे भाविकांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेणे किंवा पालखीपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. 

गेल्या वर्षी तर गर्दी इतकी वाढली होती की अनेक दिंड्यांना मुख्य पालखी सोहळ्यापर्यंत पोहोचताना मोठा संघर्ष करावा लागला होता. याच कारणास्तव मुक्कामाची जागा बदलावी, असा एक प्रवाह वारकरी संप्रदायातून पुढे आला आहे.


( नक्की वाचा : IAS Ashwini Bhide : मुंबई महापालिकेला मिळाल्या नव्या कारभारी; अश्विनी भिडे यांच्या खांद्यावर मुंबईची धुरा! )
 

भवानी पेठ की वडकी नाका?

दिंडी समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत पुण्यातील मुक्कामाबाबत अनेक गंभीर अडचणी मांडण्यात आल्या आहेत. भवानी पेठेतील जागेच्या मर्यादेमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी जागेचा विचार सुरू झाला आहे. भवानी पेठेऐवजी पुण्यातून पुढे जाताना वडकी नाका येथे 1 मुक्काम घ्यावा, अशी मागणी काही दिंडी प्रमुखांनी केली आहे. मात्र, वर्षानुवर्षांची परंपरा मोडण्यास काहींचा विरोध असल्याने यावरून संप्रदायात दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.

13 एप्रिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

या वादावर मार्ग काढण्यासाठी आणि पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी आळंदी देवस्थानने पुढाकार घेतला आहे. येत्या 13 एप्रिल रोजी एक विशेष बैठक बोलावण्यात आली असून, यामध्ये दिंडी समाजाचे प्रतिनिधी, सेवेकरी, मानकरी आणि देवस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सर्व बाजूंचा विचार करून पुण्याच्या मुक्कामाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. या निर्णयावरच आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण पालखी सोहळ्याचा अधिकृत कार्यक्रम अवलंबून असल्याने वारकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com