Sant Dnyaneshwar Palkhi 2026 Schedule: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलै रोजी आळंदीतून होणार आहे. 33 दिवसांच्या या पवित्र प्रवासानंतर हा सोहळा 8 ऑगस्ट रोजी पुन्हा आळंदीत परतणार आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटन यांची बुधवार (13) मे रोजी झालेली बैठक पार पडली, ज्यामध्ये या वर्षाच्या पालखी सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप आणि प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सोहळ्यात परंपरेप्रमाणे तीन उभी रिंगणे आणि चार गोल रिंगणे होणार आहेत. तसेच पुणे आणि सासवडमध्ये सोहळ्याचा प्रत्येकी दोन दिवसांचा मुक्काम असेल.
प्रस्थान आणि सुरुवातीचा प्रवास
8 जुलै रोजी देऊळवाड्यातून माऊलींच्या पालखीचे जल्लोषात प्रस्थान होईल. प्रस्थानाचा पहिला मुक्काम आळंदीतील नवीन दर्शन मंडपात असेल. त्यानंतर 9 जुलै आणि 10 जुलै रोजी पालखी पुण्यात मुक्कामी असेल. सासवडमध्ये 11 जुलै आणि 12 जुलै रोजी मुक्काम करून सोहळा 13 जुलै रोजी जेजुरीला पोहोचेल. 14 जुलै रोजी पालखीचा मुक्काम वाल्हे येथे असेल. 15 जुलै रोजी माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात येणार असून त्याच दिवशी पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल.
(नक्की वाचा : Pune News: माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, पुण्यातील मुक्कामाचे ठिकाण ही ठरले, 'असा' असेल मार्ग)
रिंगण सोहळा आणि पुढील मुक्काम
पालखी सोहळ्यातील रिंगणे हे वारकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र असतात. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
- 16 जुलै: दुपारी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल आणि त्यानंतर सोहळा तरडगाव मुक्कामी जाईल
- 17 जुलै: फलटण मुक्काम
- 18 जुलै: बरड मुक्काम
- 19 जुलै: नातेपुते मुक्काम
- 20 जुलै: पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल आणि सोहळा माळशिरस मुक्कामी जाईल
- 21 जुलै: सकाळी खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल. संध्याकाळी धावाबावी माउंट येथे मानाच्या भारुडानंतर सोहळा वेळापूर मुक्कामी जाईल.
- 22 जुलै: ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल. याच दिवशी दसूरफाटा येथे संत सोपानदेव आणि माऊलींची बंधूभेट होईल, त्यानंतर सोहळा भंडीशेगाव मुक्कामी जाईल.
- 23 जुलै: वाखरी येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण पार पडेल.
- 24 जुलै: इसबावी येथे तिसरे उभे रिंगण होईल आणि पादुकांजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करेल.
मुक्कामाबाबतचा पेच सुटला
पुण्यातील मुक्कामावरून काही काळ चर्चा सुरू होती. पण जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विठोबा मंदिरातील सुविधांबाबत लेखी हमीपत्र दिल्यानंतर, बुधवारी झालेल्या बैठकीत पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातच करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रिंगण सोहळ्याचे वेळापत्रक1. पहिले उभे रिंगण: चांदोबाचा लिंब – 16 जुलै
2. पहिले गोल रिंगण: पुरंदवडे – 20 जुलै
3. दुसरे गोल रिंगण: खुडूस फाटा – 21 जुलै
4. तिसरे गोल रिंगण: ठाकुरबुवाची समाधी – 22 जुलै
5. दुसरे उभे रिंगण: बाजीरावची विहीर, वाखरी – 23 जुलै
6. चौथे गोल रिंगण: बाजीरावची विहीर, वाखरी – 23 जुलै
7. तिसरे उभे रिंगण: इसबावी, पंढरपूरजवळ – 24 जुलै
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world