Nashik News: नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या अघोरी आणि फसवणुकीच्या कृत्यांचे एकेक पदर आता उलगडू लागले आहेत. भोंदूगिरी आणि विज्ञानाचा चुकीचा वापर करून त्याने सामान्य लोकांपासून ते बड्या व्यक्तींपर्यंत सर्वांना कसे गंडवले, याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकांना दैवी शक्तीचा भास करून देण्यासाठी खरात अत्यंत खालच्या थराच्या क्लृप्त्या लढवत होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
रिमोट कंट्रोल सापाचा 'चमत्कार'
अशोक खरात आपल्या आश्रमात किंवा पूजेच्या ठिकाणी नकली साप ठेवत असे. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने या सापाच्या हालचाली करून तो लोकांना 'नागदेवता' प्रसन्न झाल्याचा भास करून द्यायचा आणि त्याद्वारे भीती घालून पैसे उकळायचा. स्वतःचा दरारा निर्माण करण्यासाठी आणि तांत्रिक विधीचा मोठा प्रभाव दाखवण्यासाठी तो बेकायदेशीरपणे वाघाचे कातडेही लोकांना दाखवत असे.
(नक्की वाचा- Ashok Kharat Case: अशोक खरातबाबतचे आतापर्यंतचे 10 मोठे खुलासे, पोलिसांसह सारेच चक्रावले)
बाजारात अतिशय स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके खरात पॉलिश करून चकाकणारे बनवत असे. हे चिंचोके 'मंतरलेले' असून ते घरात ठेवल्यास समृद्धी येईल, असे सांगून तो भाविकांना गंडवायचा. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून तो केवळ 100 रुपयांच्या वस्तू समोरील व्यक्तीची आर्थिक क्षमता बघून 10 हजार ते 1 लाखांपर्यंत विकत असे. बनावट रत्ने आणि खड्यांना तो 'सिद्ध' केलेले रत्ने असल्याचे भासवायचा.
आर्थिक क्षमता बघून लूट
अशोक खरातकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची तो आधी सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी तपासायचा. ज्या व्यक्तीकडे जास्त पैसा आहे, त्याला तो तितकाच मोठा 'दोष' सांगून महागड्या वस्तू गंडा-दोरे आणि बनावट रत्नं गळ्यात मारायचा.
(नक्की वाचा- Ashok Kharat: 'व्ही. के सिंग अशोक खरातचा भक्त, अजित पवारांच्या अपघाताशी कनेक्शन...' बड्या नेत्याचा दावा)
आता या प्रकरणात केवळ बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायदाच नाही, तर प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे, कारण त्याने वाघाचे कातडे वापरल्याचे समोर आले आहे. तसेच, फसवणुकीच्या गुन्ह्यांची व्याप्तीही वाढणार आहे.