Ashok Kharat: अशोक खरात प्रकरण; रूपाली चाकणकरांच्या व्हायरल व्हिडीओ खळबळ, राजकारण पेटलं

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा खरातचे गुणगाण गातानाचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins


नाशिकच्या अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्यावरील बलात्काराच्या आरोपांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशोक खरातचे अनेक बड्या नेत्यांसोबत कनेक्नन असल्याचे समोर येत असतानाच, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांचा अशोक खरातबद्दलचा  एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

नव्याने समोर आलेल्या व्हिडिओत रूपाली चाकणकर अशोक खरात समोर उभ्या राहून त्यांचे आभार मानताना दिसत आहेत. "जन्म देणारी आई माझी गुरू.  मला चालायला बोलायला शिकवलं ते वडील माझे गुरू. पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, या जन्मात करायचंय काय हे सांगणारे गुरूमाऊल तुम्ही म्हणून मी तुमच्यापुढे उभी आहे. आज मी जे काही आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सर्व अस्तित्व तुमचं आणि या गुरुमाऊलींचे आहे, असं रुपाली चाकणकर म्हणताना दिसत आहेत. यापूर्वी त्यांचा खरातचे पाय धुतानाचा (पाद्यपूजा) व्हिडिओही व्हायरल झाला होता.

Advertisement

(नक्की वाचा-  Nashik News: महाराष्ट्राची एपस्टीन फाईल! सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर हल्लाबोल; 'कॅप्टन' खरात प्रकरणी गंभीर आरोप)

रूपाली ठोंबरे पाटील यांची आक्रमक भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांवर निशाणा साधला आहे. अशोक खरात याच्या अनैतिक कृत्यांची माहिती असतानाही त्याला पाठीशी घातल्याचा संशय व्यक्त करत, रूपाली चाकणकर यांना या गुन्ह्यात 'सह-आरोपी' करावे, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे. "महिला आयोगाच्या अध्यक्षाच जर अशा भोंदू बाबांच्या पाठीशी असतील, तर पीडित महिलांना न्याय कसा मिळणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

"महाराष्ट्राची एपस्टीन फाईल"

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे* यांनी या प्रकरणाला 'महाराष्ट्राची एपस्टीन फाईल' असे संबोधले आहे. "महिला आयोगाच्या अध्यक्षांनी लिंगपिसाट माणसाचे पाय धुवावेत, हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणे आहे," अशी टीका अंधारे यांनी केली आहे.

(नक्की वाचा-  Nashik News: ज्योतिषी अशोक खरात बलात्काराच्या आरोपाखाली गजाआड; महिलांचे 58 VIDEO सापडल्याने खळबळ)

नाशिक पोलिसांना तपासात अनेक व्हिडीओ सापडले आहेत. पोलीस या व्हिडिओंमधील संवादांची आणि खरात याच्याशी असलेल्या आर्थिक किंवा संस्थात्मक संबंधांची चौकशी करण्याची शक्यता आहे. खरात याच्या 'शिवनिका ट्रस्ट'मध्ये चाकणकर यांचे नाव संचालक म्हणून असल्याचेही आरोप झाले आहेत, ज्याची पडताळणी आता सुरू आहे.