शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News : अमरावतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. दहा नगरपरिषद दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाच निवडणूक काळात नव्या वादाला तोंड फुटण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात 'आय लव्ह मोहम्मद'चे पोस्टर लागल्यानंतर आता 'विचारा इस्लामविषयी?' (Ask About Islam) असा मजकूर असल्याचे होर्डिंग्ज मध्यवस्तीत लागले आहे. यावर भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आक्रमक होतं आक्षेप घेत कार्यवाहीची मागणी केली आहे.
अमरावती शहरात पंचवटी चौकासह इतर मुख्य चौकात सध्या इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे (IIC) फलक लागल्याचे पाहायला मिळत आहे. या फलकावर 'विचारा इस्लामविषयी?' असा मजकूर नमूद आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना यावरून आक्रमक पवित्रा घेऊ शकतात. तर दुसरीकडे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी या फलकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. बोंडेनी फलकावर असलेल्या टोलफ्री क्रमांकावर फोनही केला. हैदराबादवरून ही संस्था चालविली जातं असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
नक्की वाचा - Delhi Blast : दिल्ली बॉम्ब स्फोटाचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य, मृतदेहांची भयाण अवस्था
'कुणाची हत्या करणं इस्लाममध्ये वैध आहे का?'
IIC चे मुख्य केंद्र हे हैदराबाद आहे. महाराष्ट्रासह अनेक भागात आमच्या शाखा आहेत. कुणाची हत्या करणं इस्लाममध्ये वैध आहे का? असा प्रश्न त्यांनी केला, त्यावर नाही असं उत्तर देण्यात आलं. हाच प्रचार तुम्ही होर्डिंगच्या माध्यमातून का करत नाही. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा निषेध का करत नाही असाही प्रश्न बोंडे यांनी विचारला. मात्र त्यावर उत्तर देण्यात आलं नाही. अमरावती शहरात शाळा, महाविद्यालय असलेल्या बहुसंख्यांक हिंदू बहुल भागात इस्लाम विषयीचे होर्डिंग लागल्याने अल्पवयीन मुलांमध्ये धर्मांतरणाचा प्रचार करणे हा अजेंडा या पोस्टरच्या माध्यमातून राबवला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. खासदार अनिल बोंडे यांनी याविषयी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यामागे असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.