Badlapur News : अंबरनाथ आणि बदलापूरकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूरकर प्रतीक्षा करत होते तो क्षण अखेर जवळ आला आहे. मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या उपनगरीय रेल्वेच्या लोकल गाड्यांवरील भार कमी करण्यासाठी आता मेट्रोचे जाळे थेट बदलापूरपर्यंत विस्तारले जाणार आहे.
कल्याण-डोंबिवलीपर्यंत मर्यादित असलेल्या मेट्रो प्रकल्पाला आता नवी गती मिळाली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, मेट्रो मार्गिका ५ ठाणे-भिवंडी-कल्याणचा विस्तार आता पुढे अंबरनाथ आणि बदलापूरपर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा दररोजचा खडतर प्रवास सुखकर आणि वातानुकूलित होणार आहे.
रिअल इस्टेट आणि स्थानिक उद्योगांनाही मोठी चालना...
ही मेट्रो मार्गिका कल्याणहून पुढे उल्हासनगर, अंबरनाथमार्गे थेट बदलापूरला जोडली जाईल. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी टू वे मेट्रो कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. त्यामुळे ही शहरं मुंबई आणि पश्चिम मुंबईशी जोडली जाणार आहे. या दोन्ही शहरांना जोडणारी मेट्रो सेवा आता दृष्टीक्षेपात आली आहे. सध्या कर्जत-कसारा लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी पाहता, मेट्रो हा एक उत्तम पर्याय ठरेल. रस्ते मार्गावरील ट्रॅफिक आणि सिग्नलच्या कटकटीतून मुक्तता मिळून प्रवासाचा वेळ ३० ते ४० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे झपाट्याने विस्तारत आहेत. मेट्रो आल्यामुळे केवळ प्रवासच सोपा होणार नाही, तर या भागातील रिअल इस्टेट आणि स्थानिक उद्योगांनाही मोठी चालना मिळेल. विशेषतः बदलापूरमधील निसर्गरम्य परिसर आणि अंबरनाथची औद्योगिक वसाहत मेट्रोमुळे मुंबईच्या अधिक जवळ येईल.
५०० कोटींचा निधी मंजूर...
कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो सेवेमुळे बदलापूर आणि अंबरनाथ ही शहरं मुंबईशी मेट्रोने जोडली जाणार आहे. यासाठी ५०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत काटई नाका ते बदलापूरपर्यंतचे मेट्रोचं काम केलं जाणार आहे. लोकल ट्रेनमधील गर्दीतून सुटका मिळवण्यासाठी मेट्रो हा एकमेव पर्याय होता. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल.