मेट्रोचे जाळे, बस आणि ॲप-आधारित टॅक्सींचे पर्याय उपलब्ध असूनही, मुंबईची उपनगरी रेल्वे आजही शहराची खरी जीवनवाहिनी ठरत आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway) कामाच्या दिवशी प्रवाशांची संख्या 62 लाखांवर पोहोचली आहे. पश्चिम रेल्वेचे (Western Railway) 31 लाख प्रवासी मिळून हा आकडा आता दररोज 1 कोटीच्या जवळ जाऊ लागला आहे.
नक्की वाचा: मुंबईत घडली आणखी एक भयंकर दुर्घटना, सुदैवाने जिवीहानी नाही
लोकल ट्रेनचा प्रवास परवडणारा
मुंबईत स्वस्त घरे उपलब्ध नसल्यामुळे लोक उपनगरांत आणि मुंबईला लागून असलेल्या जिल्ह्यांत स्थायिक होत आहेत, यातले बहुतांश नागरीक उद्योगधंद्यासाठी रोज मुंबईला ये-जा करत असतात. यासाठी हे सगळे नागरीक लोकलवरच अवलंबून असतात. सीएसएमटी ते कल्याण हे 51 किमीचे अंतर कापण्यासाठी लोकलने अंदाजे सव्वा ते दीड तास लागतो आणि या प्रवासासाठीचे तिकीट फक्त 15 रुपये आहे. हेच अंतर रस्ते मार्गाने कापण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि पैसेही बरेच खर्च होतात. मेट्रोचे जाळे या भागापर्यंत अजून पोहोचलेले नाहीये, त्यामुळे इथल्या नागरिकांना लोकल ट्रेनवरच अवलंबून राहावे लागते.
नक्की वाचा: बीएमसीचा बिग डे! बुधवारी होणार 4 मोठ्या समित्यांचा फैसला, कोण होणार अध्यक्ष? वाचा संभाव्य दावेदार
लोकल विरूद्ध मेट्रो! दिवसाला किती जण प्रवास करतात?
- मध्य रेल्वेवरील दैनंदिन प्रवासी: 62 लाख.
- पश्चिम रेल्वेवरील दैनंदिन प्रवासी: 31 लाख.
- मेट्रोचे एकूण प्रवासी: मुंबईतील सर्व मेट्रो लाईन्स मिळून दररोज साधारण 9 लाख प्रवासी प्रवास करतात, जे लोकलच्या तुलनेत खूपच कमी आहेत.
- सर्वोच्च प्रवासी संख्या: 5 जानेवारी 2026 रोजी मध्य रेल्वेवर 72.18 लाख आणि पश्चिम रेल्वेवर 52.07 लाख प्रवाशांची नोंद झाली.
लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी
मिड-डे या वर्तमानपत्राने ही बातमी दिली असून त्यांच्याशी बोलताना मुंबई मोबिलिटी फोरमचे ए.व्ही. शेणॉय यांनी म्हटले की, मुंबईत परवडणारी घरे राहिलेली नाहीत, परवडणाऱ्या घरांसाठी लोक दूरवर जाऊन राहू लागले, मात्र रोजगारासाठी लोकलने प्रवास करणे हाच त्यांच्यासाठी एकमेव व्यावहारिक पर्याय उरला आहे. प्रवाशांची ही वाढती संख्या पाहता रेल्वेने गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world