Badlapur News: बदलापूर शहरात सध्या पालकांच्या चिंतेत भर टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे. चित्रकला स्पर्धेचे आमिष दाखवून शेकडो पालकांना एका ठिकाणी जमवून त्यांची फसवणूक करण्यात आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
"तुमच्या मुलाचा चित्रकला स्पर्धेत पहिल्या 25 क्रमांकात नंबर लागला आहे," असे खोटे सांगून अनेक पालकांना एका विशिष्ट ठिकाणी बोलावण्यात आले. मात्र, तिथे गेल्यावर हा सर्व प्रकार केवळ लोकांचा वैयक्तिक डेटा गोळा करण्यासाठी आणि विमा (Life Insurance) विकण्यासाठी रचलेला बनाव असल्याचे स्पष्ट झाले.
फसवणुकीची पद्धत
गेल्या काही दिवसांपासून बदलापुरातील पालकांना सतत फोन येत होते. त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या मुलांनी उत्तम कामगिरी केली असून बक्षीस वितरणासाठी त्यांना उपस्थित राहायचे आहे. मुलांसाठी पालक आपली कामे सोडून तिथे पोहोचले असता, त्यांना चित्रकला स्पर्धेऐवजी 'एज्युकेशन आणि लाईफ इन्शुरन्स अवेअरनेस प्रोग्राम' ऐकण्यास भाग पाडले गेले. उपस्थित असलेल्या प्रत्येक पालकाकडून फॉर्म भरून घेण्यात आले, ज्याद्वारे त्यांचे नाव, नंबर आणि इतर माहिती गोळा करण्यात आली.
(नक्की वाचा- UTS App: रेल्वे प्रवाशांसाठी सोईस्कर असलेलं UTS अॅप बंद होणार; नवीन अॅप डाऊनलोड करावं लागणार)
नागरिकांचा संताप आणि कारवाई
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आणि काही जागरूक महिलांनी तिथेच जाब विचारण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर 'Bhojjan Katta' नावाच्या अकाऊंटवरून या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती शेअर करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Nagpur News: भाजप नगरसेविकेच्या पतीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला; नागपुरात खळबळ)
जेव्हा काही पालकांनी या चुकीच्या कृत्याचा विरोध केला, तेव्हा तिथे असलेला स्टाफ हसत होता आणि अहंकारी वर्तन करत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा प्रकार निदर्शनास आणून दिल्याबद्दल श्रद्धा ठोंबरे, निधी आणि तनया कुलकर्णी यांसारख्या सजग महिलांचे आणि बदलापूर पोलिसांचे आभार मानले जात आहेत.