Nagpur News: नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर जुन्या मित्रानेच प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. नागपूरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी तलाव परिसरात ही घटना घडली .
भाजप नगरसेविका मानसी सिमले यांचे पती निखिल श्याम सिमले यांच्यावर त्यांचाच जुना मित्र महेश ऊर्फ सोनू गणेश ठाकरे याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात निखिल सिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात
निखिल सिमले आणि आरोपी महेश ठाकरे हे दोघे जुने मित्र आहेत. पूर्वी घडलेल्या एका हत्याकांडात हे दोघेही सह-आरोपी होते, मात्र त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली होती. शुक्रवारी तलाव परिसरात हे दोघे समोरासमोर आले असता, कोणत्यातरी जुन्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या महेशने आपल्याजवळील चाकू काढून निखिल यांच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले.
(नक्की वाचा- UTS App: रेल्वे प्रवाशांसाठी सोईस्कर असलेलं UTS अॅप बंद होणार; नवीन अॅप डाऊनलोड करावं लागणार)
प्रकृती चिंताजनक, पोलीस तपास सुरू
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निखिल सिमले यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी महेश ठाकरे याचा शोध सुरू केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world