निनाद करमरकर, बदलापूर
बदलापुरातील चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणात पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आरोपी अक्षय शिंदेबाबत देखील एक चक्रावणारी माहिती समोर आली आहे. अवघ्या 24 वर्षांच्या अक्षयने तीन लग्न केली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून निघून गेल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ 24 वर्षे आहे. मात्र त्याचे आधीच तीन लग्न झाले होते. मात्र त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. बदलापूरमधील एका नामवंत शाळेत तो सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. याआधी एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
(नक्की वाचा- बदलापुरातील 'ती' शाळा भाजपसंबंधित, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप)
आरोपीच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड
अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म मात्र बदलापूरमधील खरवई गावात झाला. तो खरवई गावातील एका चाळीत आपल्या आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता. मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे. अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते, त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली. या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहेत. गावातील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते, परंतु कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही.
आरोपीला पोलीस कोठडी
आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं होतं.
(नक्की वाचा- 'बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित', मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून संताप)
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील या घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे. महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.