निनाद करमरकर, प्रतिनिधी
Badlapur News : बदलापुरकरांसाठी महत्त्वाची सूचना आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 1 कायमस्वरूपी बंद करून होम प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बनवलं जाणार आहे. यासाठी शनिवार आणि रविवारी ब्लॉक घेण्यात आला असून प्रवाशांमधून मात्र या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात पुलाचं काम सुरू आहे. परिणामी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर अनेक ठिकाणी छप्पर हटविण्यात आले आहेत तर अनेक पंखेही सुरक्षेचं कारण देत बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उकाड्यात प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान बदलापुरकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वर्षभरापूर्वी प्रवाशांनी केलेल्या विरोधानंतर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म नंबर 1 बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र आता होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. यासाठीच शनिवार आणि रविवारी रात्री ब्लॉकही जाहीर करण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर लोकलने आलेल्या प्रवाशांना फक्त वैशाली टॉकीजच्याच दिशेनं बाहेर पडता येईल, तसंच बदलापूर सीएसएमटी लोकल पकडण्यासाठीही वैशाली टॉकीजकडूनच जावं लागेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि होम प्लॅटफॉर्म याच्या मध्ये जाळ्या बसवण्यात येणार असून त्यामुळे बदलापूर लोकलमध्ये एकाच बाजूने प्रवाशांना चढ-उतार करावी लागेल. याबाबत प्रवाशांमध्ये कुठेही वाच्यता होऊ नये, म्हणून अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे. या निर्णयाला बदलापुरातील रेल्वे प्रवाशांमधून विरोध होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Mumbai AC Local : मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या संख्येत वाढ, बदलापुरातून सकाळीही AC लोकल सुटणार
काय आहे कारण?
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. अनेकदा कर्जत आणि बदलापूर लोकल एकाच वेळेस येते. त्यामुळे मधल्या पुलावर मोठी गर्दी होते. यामुळे चेंगराचेंगरीची समस्या उद्भवू शकते. हे टाळण्यासाठी एक नंबरचा प्लॅटफॉर्म बंद करून होम प्लॅटफॉर्म करण्यात आला आहे. याशिवाय होम प्लॅटफॉर्मवरील प्रवाशाला दुसऱ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर जाता येणार नाही यासाठी मध्ये जाळ्या लावण्यात आल्या आहेत.