अमजद खान, कल्याण
लोकल ट्रेनमध्ये काही दिवसांपूर्वी 20 लाख रुपयांची रोकड सापडली होती. या पैशांचा मालक आता कल्याण रेल्वे पोलिसांसमोर आला आहे. सचिन बोरसे असं या व्यक्तीचे नाव आहे. बोरसे हे धुळ्यात मोठे कंत्राटदार आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी ते पैसे घेऊन मुंबईला येत होते. याआधी मुंब्र्याहून आलेल्या एका व्यक्तीने या पैशांवर आपला दावा ठोकला होता. आता तो व्यक्ती कोण आहे? याचा शोध कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत.
कल्याण रेल्वे पोलिसांकडे काही दिवसापूर्वी काही प्रवाशांनी एक बेवारस बॅग आणून दिली होती. त्या बॅगेत 20 लाख रुपयांची रोकड होती. पैशांनी भरलेली बॅग पाहून पोलिसांनाही धक्का बसला होता. त्यांनी पैसे जप्त करुन त्याचा पुढील तपास सुरु केला.
(नक्की वाचा- Bus Fire : टायर फुटल्याने स्कूल बसला आग, विद्यार्थ्यांसह 25 जणांचा होरपळून मृत्यू)
कसारा सीएसएमटी लोकलमध्ये आसनगाव जवळ हे पैसे एका डब्यात सापडले होते. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यासाठी तीन पथके नेमण्यात आली. रेल्वे स्थानकात लावलेले सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु होते. याच दरम्यान कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात एकजण आला. तो मुंब्रा येथे राहणारा आहे. त्याने सांगितले की ते पैसे माझे आहेत.
पोलिसांनी त्याला सांगितले की, या संदर्भातील सगळी माहिती घेऊन या. त्यानंतर चौकशी करुन पुढील प्रक्रिया करणार. तो व्यक्ती परत आला नाही. याच दरम्यान सचिन बोरसे हा व्यक्ती पुढे आला. बोरसे हे धुळ्यातील राहणारे आहेत. सोलार सिस्टीम बसवण्याचे ते कंत्राट घेतात. त्याचे कुटुंबिय मुंबई येथील चर्चगेट परिसरात राहतात.
(नक्की वाचा- ऑनलाईन ऑर्डर, मग मर्डर! दीड लाखांच्या iPhone साठी डिलिव्हरी बॉयला संपवलं)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन बोरसे यांनी सांगितले की, त्यांना मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागणार होते. ते पैसे घेऊन ते मुंबईला येत होते. कसाराहून त्यांनी कल्याणसाठी लोकल ट्रेन पकडली.आसनगाव रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच त्यांना झोप लागली. याच वेळी तरुणाचा एक मोठा ग्रुप गाडीत चढला. चूकून या ग्रुपच्या एका तरुणाने माझी बॅग घेऊन कल्याण रेल्वे स्थानकात उतरून घेतलं. मात्र बॅगमध्ये पैसे दिसल्याने त्याने ती पोलिसात जमा केली. या प्रकरणाचा पुढील तपास आता कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत.