जाहिरात

'सिया पॉईंट' केवळ सुरुवात, जगभरातील भयानक जागा ठरत आहेत नवे पर्यटन स्थळ; पाहा Dark Tourism चा थरारक पॅटर्न

What is Dark Tourism: हा केवळ सोशल मीडियाचा ट्रेंड नसून, जागतिक स्तरावर हा एक प्रचंड मोठा उद्योग बनला आहे. 

'सिया पॉईंट' केवळ सुरुवात, जगभरातील भयानक जागा ठरत आहेत नवे पर्यटन स्थळ; पाहा  Dark Tourism चा थरारक पॅटर्न
What is Dark Tourism: मानवी मनाच्या या विचित्र उत्सुकतेला शैक्षणिक भाषेत डार्क टुरिझम असे म्हटले जाते.
मुंबई:

What is Dark Tourism:  लोहगड किल्ल्यावर फिरायला येणारे पर्यटक आता गाईडला पहिला प्रश्न विचारतात, तो म्हणजे सियाने केतनला ज्या जागेवरून खाली ढकलले, तो स्पॉट कुठे आहे? काही शतकांचा मराठा इतिहास, विंचू काटा आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यावर अचानक पर्यटकांची गर्दी 25 टक्क्यांनी वाढली आहे. याचे कारण इतिहास नसून, एका प्रेयसीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्याच होणाऱ्या नवऱ्याचा केलेला थरारक खून हे आहे. 

केतन अग्रवालच्या हत्येनंतर हा स्पॉट पाहण्यासाठी लोक दुरून दुरून येत आहेत. ही गर्दी आणि लोकांची उत्सुकता इतकी वाढली की पोलिसांना तपासादरम्यान काही काळ ही जागा बंद करावी लागली होती. पूर्वी ज्या ठिकाणी एखादी वाईट घटना घडायची, ती गल्ली किंवा ते घर लोक टाळायचे, पण आता मात्र अशा जागा शोधून लोक तिथे सेल्फी काढायला जात आहेत.

काय आहे हा डार्क टुरिझमचा अब्जावधींचा व्यवसाय?

मानवी मनाच्या या विचित्र उत्सुकतेला शैक्षणिक भाषेत डार्क टुरिझम असे म्हटले जाते. मृत्यू, शोकांतिका आणि ऐतिहासिक संकटांशी जोडलेल्या जागांना भेटी देणे म्हणजे डार्क टुरिझम. हा केवळ सोशल मीडियाचा ट्रेंड नसून, जागतिक स्तरावर हा एक प्रचंड मोठा उद्योग बनला आहे. 

आकडेवारीनुसार,  2025 मध्ये या डार्क टुरिझमची जागतिक बाजारपेठ तब्बल 32.8 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 3 लाख 16 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 2030 च्या सुरुवातीला हा आकडा 4 लाख कोटी रुपयांच्या पार जाण्याचा अंदाज आहे. जगभरात अशा अनेक जागा आहेत जिथे करोडो लोक केवळ तिथला इतिहास आणि शोकांतिका अनुभवायला जातात.

( नक्की वाचा : Lohagad Fort: लोहगडावरील 'सिया पॉईंट'पाहण्यासाठी देशभरातून गर्दी; 2000 वर्षांच्या इतिहासाला अनपेक्षित वळण )
 

जगभरातील प्रसिद्ध आणि भयानक पर्यटन स्थळे

इटलीतील पाँपेई पुरातत्व पार्क येथे ज्वालामुखीच्या उद्रेकात संपूर्ण शहर गाडले गेले होते, तिथे वर्ष 2024 मध्ये 40 लाख लोकांनी भेट दिली. इतकी गर्दी वाढली की प्रशासनाला तिथे दररोज केवळ 20 हजार लोकांनाच प्रवेश देण्याचा नियम करावा लागला. 

अमेरिकेतील 9/11 मेमोरियल आणि म्युझियमला आतापर्यंत 1 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली आहे. जपानमधील हिरोशिमा पीस मेमोरियल आणि पोलंडमधील नाझींचा छळ छावणी असलेला ऑशविझ-बिर्केनाऊचा परिसर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक गर्दी करत असतात.

 वाईट गोष्टी पाहण्याची उत्सुकता का असते?

मानसशास्त्रज्ञांच्या मते, लोक अशा क्रूर जागांना भेट देतात कारण त्यामागे मानवी उत्सुकता आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव कारणीभूत असते. मानसशास्त्रात याला टेरर मॅनेजमेंट थेअरी म्हणतात. एका सुरक्षित वातावरणात राहून मृत्यू किंवा भीतीचा अनुभव घेतल्याने माणसाला आपण जिवंत असल्याचा आनंद मिळतो. 

याशिवाय, जसा रस्त्यावर अपघात झाल्यावर लोक वाहन हळू करून, किंवा तिथं उभं राहून काय झाले ते पाहण्याचा प्रयत्न करतात, तसाच हा एक मानवी स्वभाव आहे. दुसऱ्यासोबत काय वाईट घडले, हे पाहून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे, ही मानवी भावना यामागे असते. मात्र, एखाद्या कुटुंबाचे दुःख असलेल्या क्राईम स्पॉटला विकेंड हँगआऊट किंवा सेल्फी पॉइंट बनवणे हे मानवी संवेदनशीलतेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

( नक्की वाचा : Lohagad Fort: नरबळी ते भुतांचा वावर, 2000 वर्ष जुना लोहगड किल्ला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला का आहे? )

 सिनेमा आणि वेब सीरिजची क्रेझ

वास्तविक जीवनातील डार्क टुरिझमप्रमाणेच डिजिटल जगतात देखील ट्रू क्राईम म्हणजेच खऱ्या गुन्ह्यांवर आधारित माहितीपट आणि वेब सीरिज पाहण्याची मोठी क्रेझ आहे. भारतात हे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. ओआरएमएएक्स मीडियाच्या अहवालानुसार, भारतातील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या एकूण नवीन कंटेंटमध्ये तब्बल 43 ते 47 टक्के वाटा हा ॲक्शन, क्राईम आणि थ्रिलर या प्रकारातील सिनेमा आणि सीरिजचा आहे. 

दिल्लीतील बुरारी केसवर आधारित हाऊस ऑफ सीक्रेट्स किंवा वीरप्पनवर आलेली सीरिज प्रचंड गाजली. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम आणि जिओहॉटस्टार सारख्या कंपन्या यामुळेच खऱ्या गुन्ह्यांवर आधारित कंटेंट बनवण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. सुरक्षित घरात बसून थरार अनुभवण्याची ही माणसाची मानसिक गरज डार्क टुरिझमला मोठ्या प्रमाणावर चालना देत आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com